संजीव गोयंका यांना समजावणं खरंच कठीण! एलएसजी सोडल्यानंतर राहुलचं थेट मत
भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुलने आयपीएल टीमचा कर्णधार म्हणून काम करताना येणाऱ्या दडपणाबद्दल बोलताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. एलएसजीचा कर्णधार असलेला राहुल 2024 सीजननंतर संघातून बाहेर पडला आणि 2025 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसला. आयपीएलमध्ये नेतृत्व करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याबद्दलही त्याने सांगितले. त्याच्या वक्तव्यावरून असेही वाटते की त्याने अप्रत्यक्षरित्या संजीव गोयंका यांच्यावरही टीकेची बाण सोडले आहेत.
2024 मध्ये एलएसजीला एका महत्त्वाच्या सामन्यात 10 विकेट्सने मोठा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर संघमालक संजीव गोयंका आणि राहुल यांच्यात झालेली चर्चा जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. याच घटनेपासून दोघांचे संबंध बिघडल्याची चर्चा होती. एलएसजीसाठी सर्वाधिक धावा केल्या असूनही राहुलला रिटेन करण्यात आले नाही.
आता राहुलने सांगितले की जे लोक कधी क्रिकेट खेळलेलेच नाहीत, त्यांना कॅप्टन म्हणून उत्तर देणे खूप कठीण जाते. असा अंदाज व्यक्त केला जातो की त्याने संजीव गोयंकांवरच हा अप्रत्यक्ष टोला मारला आहे. त्याने पुढे सांगितले की…
“आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सतत मीटिंग्स कराव्या लागतात. कायम रिव्ह्यू चालू असतो आणि ओनरशिप लेव्हलवर असलेल्या लोकांना उत्तर द्यावे लागते. मी या सगळ्या गोष्टींनी पूर्णपणे थकून गेलो होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मी दहा महिने खेळतो, पण आयपीएलमध्येच जास्त दमछाक होते असे मला वाटायचे. असे प्रश्न वर्षभर कुणी विचारत नाही. आपण फक्त कोच आणि निवडकर्त्यांनाच उत्तर देतो. तुम्ही काहीही करा, खेळात कधीच विजयाची हमी नसते. ज्यांचा स्पोर्ट्सचा बॅकग्राउंड नाही, त्यांना हे समजावून सांगणे खूप अवघड जाते.”
एलएसजीकडून रिटेन न झाल्यानंतर केएल राहुलला डीसीने टीममध्ये घेतले. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने अप्रतिम फलंदाजी केली. 13 सामन्यांत त्याने 539 धावा केल्या. त्याचा सरासरी 53.90 असा होता आणि 149.72 च्या शानदार स्ट्राइक रेटने तो तुफानी खेळला. या सीझनमध्ये त्याने 3 अर्धशतके आणि 1 शतक ठोकले. राहुलवर कप्तानीचा तितका ताण नव्हता आणि त्यामुळे तो मैदानात धमाका करताना दिसला.
Comments are closed.