दुसरी कसोटी शुबमन गिल खेळणार नाही? प्रशिक्षक गंभीर यांनी कर्णधाराच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट!

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुबमन गिल (Shubhman gill) दुखापत झाल्याने ‘रिटायर्ड हर्ट’ झाला आणि मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा खेळायला मैदानावर येऊ शकला नाही. गिलला मानदुखी होत होती, त्यामुळे त्याला रुग्णालयात न्यावं लागलं. त्याच्या अनुपस्थितीची भारताला कोलकाता कसोटीत मोठी किंमत मोजावी लागली, कारण 124 धावांचं छोटं लक्ष्य असूनही भारताला 30 धावांनी पराभव स्विकारावा लागला. सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत आले आणि त्यांनी गिलच्या दुखापतीबाबत महत्त्वाचं अपडेट दिली.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसरी कसोटी शनिवार, 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितलं की, दुसऱ्या कसोटीमध्ये शुबमन गिल (Shubman gill) खेळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्याची फिटनेस तपासल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

गंभीर म्हणाले की, शुबमन गिल सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहेत. त्यांनी सांगितलं, आम्ही गिलची फिटनेस तपासत आहोत. पुढे काय होतं ते पाहू. फिजिओ आज संध्याकाळी गिलच्या दुखापतीबाबत निर्णय घेतील आणि त्यानुसार आमचा पुढचा निर्णय ठरेल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीत ईडन गार्डन्सची खेळपट्टी जशी दिसली, तिची बरीच टीका झाली आहे. मात्र कोच गौतम गंभीर यांनी खेळपट्टीचं समर्थपणे बचाव केला. ते म्हणाले की या खेळपट्टीवर फलंदाजाच्या संयमाची खरी परीक्षा होती. इथे सावधपणे, थांबून खेळण्याची गरज होती. त्यांनी टेंबा बावुमा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची उदाहरणंही दिली.

गंभीर म्हणाले, ही खेळपट्टी अगदी आपण जशी मागितली होती तशीच होती. यात काहीच त्रुटी नव्हत्या, ती पूर्णपणे खेळण्यायोग्य होती. जर कोणी तिला टर्निंग विकेट म्हणत असेल, तर इथे जास्त विकेट तर सीमर्सनीच घेतल्या.

Comments are closed.