दक्षिण मध्य मुंबईत खेळ महोत्सवाची धडाकेबाज सुरुवात, मुलांना मैदानात खेळू द्या – खासदार अनिल देसाई

‘मुलांना मोकळ्या मैदानात धावू द्या, खेळू द्या. यामुळे शरीरसुदृढता, आत्मविश्वास आणि बौद्धिक वाढ घडते. स्वामी विवेकानंदांनीही क्रीडेमुळे होणाऱ्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. विभागातील प्रत्येक खेळाडूने या महोत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक आणि खासदार अनिल देसाई यांनी केले. यादरम्यान दक्षिण मध्य मुंबईतील सर्वात मोठ्या सांस्कृतिक, कला व क्रीडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन चेंबूरच्या गांधी मैदानात करण्यात आले.

माजी आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू महेंद्र चेंबुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन पार पडले. 15 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात मल्लखांब, योग, अ‍ॅक्रोबेटिक्स आणि रस्सीखेच यांसारख्या पारंपरिक व आधुनिक खेळांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. खेळाडूंच्या दमदार कलेने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली.

कार्यक्रमात महोत्सवाच्या अधिकृत टी-शर्टचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, नवोदित मल्लखांबपटूंना रोख पारितोषिक देत त्यांचा उत्साह वाढवण्याचे काम खासदार अनिल देसाई यांनी केले. ही क्रीडाप्रेमींच्या दृष्टीने सकारात्मक आणि कौतुकास्पद बाब असल्याचे चेंबुरकर यांनी नमूद केले. त्यांनी पुढे अपेक्षा व्यक्त केली की, ‘जागतिक स्तरावर झेपावलेल्या मल्लखांबपटूंना आवश्यक सुविधा आणि पायाभूत सुविधा मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश मिळवू शकतात.’

या उत्साहवर्धक सोहळ्यात शिवसेना उपनेते व माजी महापौर मिलिंद वैद्य, सुबोध आचार्य, सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी आमदार प्रकाश व सुप्रदा फापर्तेकर, पद्मावती शिंदे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, क्रीडाप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.