दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतराला केंद्राने लावला ब्रेक, चुकीचा प्रस्ताव पाठवल्याने रेड सिग्नल

महायुती सरकारच्या घोषणांना ब्रेक लागण्याच्या घटनेमध्ये आखणीन एक भर पडली आहे. दहिसर टोलनाक्याचे स्थलांतर झाल्याची घोषणा महायुती सरकारने मोठा गाजावाजा करीत केली; पण केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एनएचएआय) दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतराला ब्रेक लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुती सरकारची ही घोषणाही फसवी निघाल्याचे चित्र आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱया दहिसर टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि ठाण्याला जाणाऱया प्रवाशांना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे दहिसर टोल नाका नायगावच्या वर्सोवा पुलाजवळ स्थलांतरित करण्याची योजना आखण्यात आली. त्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. टोल नाक्याच्या स्थलांतराच्या घोषणेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहिसरनंतर आता वर्सोव्यात कोंडी
टोल नाका स्थलांतरित केल्यानंतर आता वर्सोवा भागातील नव्या टोल नाक्याच्या परिसरात वाहतूक कोंडी सुरू झाल्याचे वृत्त आहे. संध्याकाळी तर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडल्याचे चित्र निर्माण झाले होते. टोल नाका स्थलांतरित झाल्यामुळे मेट्रो स्टेशनखाली नव्याने वाहतूक काsंडी सुरू झाल्याचे सांगण्यात येते.
नायगावच्या स्थानिकांचा कडाडून विरोध
हा टोल नाका वर्सोवा पुलाच्या परिसरात स्थलांतरित करण्यास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला. कारण टोल नाक्याच्या स्थलांतरामुळे आमच्या भागात वाहतूक कोंडी निर्माण होईल अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली होती. पण तरीही वर्सोवा परिसरातील स्थानिकांचा विरोध डावलून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत दहिसर टोल नाका पन्नास मीटर अंतरावर स्थलांतरीत करण्यात आला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; पण अल्पावधीतच टोल नाक्याच्या स्थलांतराचा फुगा फुटला.
वन खात्याचाही आक्षेप
ज्या भागात टोलनाक्याच्या स्थलांतराचा प्रस्ताव आहे तो भाग वन खात्याच्या अखत्यारित आहे. त्यामुळे वन जमिनीवर टोल नाका उभारता येणार नाही, असा आक्षेप वन खात्याचे घेतल्याचे वृत्त आहे.
परिवहन मंत्र्यांच्या पोस्टला ‘एनएचएआय’चे उत्तर
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा गाजावाजा करीत दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर केल्याची एक्सवर पोस्ट केली होती. आम्ही बोलत नाही कृती करतो, ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात आणला असे पोस्टमध्ये म्हटले होते. या पोस्टनंतर नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) एक्स पोस्ट करीत स्थलांतराला ब्रेक लावल्याचे जाहीर केले. दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतराचा प्रस्ताव नियमांना अनुसरून नाही. त्यामुळे टोल नाक्याच्या स्थलांतराला मंजुरी देता येत नाही, असे नमूद केले.
‘एमएसआरडीसी’ने दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतरचा प्रस्ताव योग्य प्रकारे पाठवलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी देता येत नाही. प्रस्ताव योग्य प्रकारे आल्यास विचार केला जाईल. – नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया

Comments are closed.