भारताचा लाजिरवाणा पराभव; पाकिस्तानने मागील पराभवाचा हिशोब चुकता केला
रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 च्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने भारतावर 8 गडी राखून प्रभावी विजय मिळवला. या पराभवानंतर भारताची उपांत्य फेरीची संधी धोक्यात आली आहे. भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि त्यामुळे संपूर्ण सामन्याची दिशा बदलली.
नाणेफेक गमावल्यामुळे भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य यांनी डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर भारतीय डाव कोलमडायला सुरुवात झाली. प्रियांश 10 धावांवर बाद झाला. नमन धीरने 35 धावा करीत संघर्ष केला तर वैभव सूर्यवंशीने 28 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी करत संघाला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारही लगावले. पण उर्वरित फलंदाजांनी निराशा केली आणि संपूर्ण संघ 19 षटकांत 136 धावांत आटोपला.
पाकिस्तानने 137 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अतिशय दमदार सुरुवात केली. माझ सदाकत आणि मोहम्मद नईम यांनी सामन्याच्या पहिल्याच टप्प्यात भारतीय गोलंदाजांवर दडपण आणत 55 धावांची सलामी भागीदारी उभी केली. नईम 14 धावांवर बाद झाला पण तोपर्यंत पाकिस्तानची पकड भक्कम झाली होती. सदाकतने 31 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. त्याच्या आक्रमक खेळीमुळे सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला.
भारताकडून सुयश शर्मा आणि यश ठाकुर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण त्या खूप उशिरा मिळाल्या. पाकिस्तानने 8 गडी राखून सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या गोलंदाजीत शाहीद अजीझने 3 बळी घेत भारताच्या फलंदाजीची घडी विस्कटून टाकली.
भारताचा पुढील सामना 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असेल. भारत आणि ओमान या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने उपांत्य फेरीत जाण्यासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. युएईचे आव्हान मात्र या स्पर्धेतून संपुष्टात आले असून पाकिस्तानचा शेवटचा लीग सामना युएईविरुद्ध होणार आहे.
Comments are closed.