दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात कार मालक जाळ्यात
एनआयएने आमिर अलीला दिल्लीतून केली अटक : दहशतवादी उमरसोबत कटात सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने रविवारी दहशतवादी उमरचा सहकारी आमिर रशीद अलीला दिल्लीतून अटक केली. त्याने उमरसोबत दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. दिल्लीत स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार आमिरच्या नावाने नोंदणीकृत होती. एकीकडे दिल्लीत कारवाई सुरू असतानाच फरिदाबादमध्ये दोघांना अटक केली आहे. संबंधितांची नावे रिजवान आणि शोएब अशी आहेत. तसेच अन्य एका महिला डॉक्टरलाही ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली.
जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी डॉ. उमर नबीशी संबंधित अनेक व्यक्तींना ताब्यात घेण्याचा सपाटा चालवला आहे. अटकेतील व्यक्तींच्या चौकशीतून समोर येत असलेल्या माहितीच्या आधारे कारवाईचे सत्र गतिमान करण्यात आले आहे. याचदरम्यान कारचा मालक आमिर रशीद अली जाळ्यात सापडला आहे. आमिर हा मूळचा काश्मीरमधील काझीगुंड येथील रहिवासी आहे. तो ऑक्टोबर 2023 मध्ये कुलगाममधील एका मशिदीत डॉक्टर दहशतवादी मॉड्यूलशी भेटला होता असा त्याचा दावा आहे. त्यानंतर त्याला फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात नेऊन त्याला भाड्याच्या खोलीत ठेवण्यात आले. दहशतवादी मॉड्यूल त्याला ग्राउंड वर्कर बनवू इच्छित होते, असेही तपासात उघड झाले आहे.
फरिदाबादमध्ये सतर्कता
दिल्ली स्फोटानंतर फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील डॉ. उमर नबी आणि डॉ. मुझम्मिल यांच्याशी संबंधित 200 व्यक्ती एजन्सींच्या रडारवर आहेत. रविवारी पोलिसांनी नूह शहरातील हयात कॉलनीतून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. रिजवान आणि शोएब अशी त्यांची नावे असून त्यांनी रेल्वेस्थानक परिसराची रेकी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या माहितीनंतर फरिदाबाद रेल्वेस्थानकाला यासंबंधीची माहिती देऊन सतर्कता बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिशियनसह दोघांना नूह येथून अटक
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर फरिदाबाद आणि नूहमध्ये दहशतवादी नेटवर्क उघडकीस येत आहे. नूहमधील अल-फलाह विद्यापीठातील एका इलेक्ट्रिशियनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दहशतवादी निधीचा आरोप आहे. रविवारी तपास पथकाने नूह शहरातील हयात कॉलनीतून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. तपासात दोन राजकारण्यांची नावेही उघड झाली आहेत. विद्यापीठाशी संबंधित अनेक व्यक्तींची अजून चौकशी सुरू आहे. रविवारी अल-फलाह विद्यापीठातील वाहनांची तपासणीही केली जात आहे.
फरिदाबाद आणि नूहमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयए, इतर तपास संस्था आणि गुन्हे शाखेची पथके सतर्क झाली आहेत. मशिदी, भाडेपट्ट्यांच्या खोल्या, खत आणि बियाणे दुकाने आणि कार विक्री केंद्रांवर सतत छापे टाकले जात आहेत. फरिदाबादमधील धौज गावातील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित आणि डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती रडारवर आहेत. विद्यापीठात अटक केलेल्या दहशतवादी नेटवर्कशी संपर्कात असलेल्या सर्वांची पोलीस चौकशी करत आहेत.
फरिदाबादमध्ये मोठ्या आणि लहान अशा अंदाजे 1,000 मशिदी आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 500 हून अधिक काश्मिरी भाडेकरूंची कागदपत्रे तपासली आहेत. याव्यतिरिक्त इतर राज्यांमधून स्थलांतरित होऊन येथे स्थायिक झालेले 1,700 भाडेकरू आहेत. पोलीस पडताळणी कधी झाली, साक्षीदार कोण होते, किती वर्षांपासून भाड्याने राहत आहे आणि घरातील प्रत्येक सदस्य कोणते काम करतो याबद्दल माहिती गोळा करण्यात येत आहे.
Comments are closed.