IND vs SA: टेम्बा बावुमाने उघडलं दक्षिण अफ्रिकेच्या विजयाचं ‘गणित’, एका क्षणानं पलटला सामना
IND vs SA 1ST TEST: दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या 124 धावांच्या साध्यासुध्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 93 धावांवर गारद झाला. त्यामुळे भारताला 30 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढील सामना भारतीय संघासाठी करो या मरो असा ठरणार आहे.
सामन्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने त्यांच्या संघाने कसा विजय मिळवला याचं विश्लेषण सांगितलं. बावुमा म्हणाला की, अशा कसोटी सामन्यांचा भाग होणं नेहमीच विशेष असतं. पिचवर फलंदाजी करणे अवघड असणार हे आम्हाला ठाऊक होतं. आमच्यासाठीही परिस्थिती सोपी नव्हती. तरीही आम्ही आव्हानात्मक परिस्थितीत आमच्या बाजूने संधी पकडण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी खेळात पुनरागमन करून दिलं आणि त्याचा मोठा परिणाम झाला.
या सामन्यातील टर्निंग पॉइंटबाबत बोलताना बावुमाने बॉश आणि मार्को जान्सन यांच्यातील भागीदारी निर्णायक ठरल्याचं सांगितलं. त्याने स्पष्ट केलं की दिवसाच्या अखेरीस झालेली छोटी पण महत्त्वाची भागीदारी संघाला पुढील दिवशी लढण्यासाठी आत्मविश्वास देऊन गेली. 120-125 धावांचा स्कोअर विजयी ठरू शकतो याची खात्री आम्हाला होती, असंही बावुमा म्हणाला.
अक्षर पटेलचा घेतलेला झेलही बावुमाने महत्त्वाचा ठरल्याचं सांगितलं. तो म्हणाला की तो झेल सोपा नव्हता. अक्षर पटेलला गती मिळत होती आणि भारतीय फलंदाज लयीत आले की ते अधिक धोकादायक ठरतात. त्याने केलेल्या चुकीचा फायदा घेत हा झेल घेतला आणि हा क्षण संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
Comments are closed.