लालू कुटुंबातील वाद वाढला आहे
वृत्तसंस्था/ पाटणा
राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह आणखी तीव्र होत चालला आहे. रोहिणी आचार्य यांच्या वादग्रस्त विधानानंतर आणि कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर रागिणी, चंदा आणि राजलक्ष्मी आणखी तीन बहिणीदेखील आपल्या मुलांसह पाटण्याहून दिल्लीला रवाना झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेला हा वाद आता केवळ राजकीय राहिला नाही, तर कौटुंबिक पातळीवर गंभीर वळण घेताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील राजदच्या दारुण पराभवानंतर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमध्ये हा कौटुंबिक वाद पक्षासाठी आणखी एक आव्हान बनला आहे. लालूंच्या पाटण्यातील निवासस्थानातून चार मुली निघून गेल्याने राजद वर्तुळात एक गंभीर संकेत म्हणून पाहिले जात आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी शनिवारी कुटुंबाशी संबंध तोडण्याचा आणि राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. याप्रसंगी तिने आपला भाऊ तेजस्वी यादव आणि त्याचे दोन जवळचे सहकारी, संजय यादव आणि रमीज यांनी तिचा अपमान केल्याचे म्हटले होते. त्यांनी घाणेरडी शिवीगाळ केली आणि चप्पल मारण्याचा प्रयत्नही केल्याचा दावा रोहिणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दु:खाश्रू गाळले होते.
बिहार विधानसभा निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवासाठी रोहिणी आचार्य यांना जबाबदार धरल्यानंतर त्यांनी कुटुंबाशी संबंध तोडले होते. एका भावनिक पोस्टमध्ये रोहिणी यांनी आपल्याला माहेरून हाकलून लावण्यात आले आणि ‘अनाथ’ करण्यात आल्याचे म्हटले होते. माझ्याशी केलेल्या वागणुकीमुळे स्वाभिमान दुखावला असून आता पुन्हा कुटुंबाशी नाते जोडणे अवघड असल्याचेही तिने स्पष्ट केले होते. रोहिणी आचार्य ह्या एक सर्जन आणि डॉक्टर असून मर्यादित स्वरुपात राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सारणमधून राजद उमेदवार होत्या. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
तेजस्वींचे दोन निकटवर्तीय लक्ष्य
रोहिणी यांनी तेजस्वीच्या दोन जवळच्या सहकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. संजय यादव (राजद खासदार) आणि तेजस्वी यादवच्या कोर टीमचा सदस्य रमीज यांच्यामुळेच सर्वकाही घडत असल्याचे रोहिणी यांनी म्हटले आहे. दोघेही सध्या या वादावर सार्वजनिकरित्या मौन बाळगले आहे.
भाऊ तेजप्रताप दुःखी
लालू यादव यांचा सध्या विभक्त असलेला मुलगा तेज प्रताप यादव यांनी त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी कुटुंबावर लावलेल्या खळबळजनक आरोपांना उत्तर दिले आहे. एका ऑनलाइन पोस्टमध्ये तेजप्रताप यांनी आपले वडील लालू यादव यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टीची आठवण करून दिली. याचवेळी ‘माझ्यासोबत जे घडले ते मी सहन केले. पण माझ्या बहिणीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत असह्य आहे.’ असे म्हटले आहे. बिहारमधील लोक आपल्या बहिणींना टार्गेट करणाऱ्यांना माफ करणार नाहीत असा इशाराही दिला. तसेच या घटनेने मला मनापासून हादरवून सोडले आहे.
तेजप्रताप यादव यांचे वडिलांकडे आर्जव
माझी बहीण रोहिणीवर चप्पल फेकल्याची बातमी ऐकल्यापासून माझ्या हृदयातील वेदना आगीत बदलल्या आहेत असे सांगतानाच कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आपल्या वडिलांकडे तेजप्रताप यादव यांनी एक परवानगी मागितली आहे. “मी आदरणीय आरजेडी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे वडील, माझे राजकीय गुरु, श्री लालू प्रसादजी यांना विनंती करतो, बाबा, मला एक इशारा द्या… फक्त एक इशारा आणि बिहारचे लोक स्वत:च या जयचंदांना चिरडून टाकतील.”, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही लढाई कोणत्याही पक्षाविषयी नाही तर ती कुटुंबाच्या सन्मानाबद्दल, बहिणींच्या आदराबद्दल आणि बिहारच्या स्वाभिमानाबद्दल असल्याचेही स्पष्ट केले.
Comments are closed.