IND vs SA: पराभवानंतर गंभीरचा थेट प्रहार! कसोटी सामन्यातील पराभवानंतर कुठे चुकलं ते स्पष्ट सांगितलं
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सहा वर्षांनंतर कसोटीची रंगत अनुभवायला मिळाली. पण भारतीय चाहत्यांसाठी हा संघर्ष निराशाजनक ठरला. 124 धावांचे किरकोळ लक्ष्याच्या पाठलागात भारत 30 धावांनी पराभूत झाला. सामना हातात असूनही फलंदाजांनी नांगी टाकल्याने सर्वत्र टीका होऊ लागली. या पराभवानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
पत्रकार परिषदेत गंभीर यांनी स्पष्ट शब्दांत खेळपट्टीचे समर्थन केले. त्याने सांगितले की, “पिच अगदी आमच्या अपेक्षेप्रमाणे होती. क्यूरेटरने उत्कृष्ट मदत केली. आम्हाला अशीच खेळपट्टी हवी होती. पण आम्ही चांगले खेळलो नाही, म्हणून अशाच प्रकारे निकाल लागतो.” त्यांच्या वक्तव्याने त्याने थेट भारतीय फलंदाजीवर निशाणा साधल्याचे दिसून आले.
गंभीरने पुढे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि भारतीय खेळाडू अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांची उदाहरणे दिली. त्याने सांगितले की, “124 धावा या पिचवर सहज करता येण्यासारख्या होत्या. ज्यांचा बचाव मजबूत होता त्यांनी धावा केल्या. फिरकीवर खेळण्यासाठी योग्य तंत्र असणे आवश्यक आहे. पिचमध्ये कुठेही समस्या नव्हती.” यामुळे भारतीय संघाचा अपयशाचा खरा मुद्दा ‘फलंदाजी’ असल्याचे त्याने स्पष्ट केले.
भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील अपयशाचा ट्रेंडही चिंताजनक आहे. गेल्या 22 महिन्यांत भारताने घरच्या मातीवर सहा पैकी चार कसोटी सामने गमावले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 0-3 ने झालेला पराभव, फिरकीविरुद्धचा संघर्ष आणि WTC चं स्वप्न तुटणं ही सर्व चित्रं पुन्हा डोळ्यांसमोर उभी राहू लागली आहेत.
आता मालिकेतील दुसरी कसोटी 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्याने निर्माण केलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे भारतीय संघावर मालिकावाचवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. फलंदाजीत मोठे बदल आणि पुनरागमन करण्यावाचून पर्याय नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Comments are closed.