जोधपूरमध्ये ट्रक-टेम्पोची धडक
6 भाविकांचा मृत्यू 14 जण जखमी
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानातील जोधपूर-जैसलेमर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली आहे. रामदेवरा येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांनी भरलेला एका टेम्पोने समोरून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसमवेत 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृत आणि जखमी सर्वजण गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही दुर्घटना रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास खारी बेरी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. ट्रक आणि टेम्पोची धडक अत्यंत अधिक तीव्र असल्याने टेम्पोचा पुढील हिस्सा चक्काचूर झाला होता, तर ट्रकही काही अंतरापर्यंत जात पलटला होता. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील लोक रामदेवराच्या दर्शनासाठी टेम्पोमधून प्रवास करत होते. यातील 3 भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 3 जणांनी उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे.
Comments are closed.