टीम इंडियावरच ‘तो’ डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा
भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी पराभव : आव्हानात्मक घरच्या परिस्थितीत उच्च दर्जाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. ईडन गार्डन्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी भारताचा 30 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
टीम इंडियाने स्वतःच्या सूचनेनुसार फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवून घेतली आणि संघात चार फिरकीपटूंना संधीही दिली. मात्र हीच रणनीती उलट भारतावर भारी ठरली. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी संघर्ष करत कमी धावा केल्या. दरम्यान, सामन्यापूर्वीच भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यात वाद झाला अशी चर्चा आहे. त्यावर आता माजी भारतीय कर्णधार आणि CAB अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मुखर्जी यांचे समर्थन करत स्पष्ट भूमिका मांडली.
सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला पहिल्या कसोटीसाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टी हवी होती, पण ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी कुणाचंच ऐकत नव्हते. सुजन मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे की, ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल असेल. सुजन मुखर्जी यांनी गंभीर यांच्या मागणीला नकार दिल्याने गंभीर नाराज झाल्याची माहिती समोर आली होती आणि दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चाही पहिल्या कसोटी आधी रंगल्या होत्या. पण टीम इंडियाने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीच्या सूचना देत तशी खेळपट्टी बनवून देखील घेण्यात आली. पण, टीम इंडियावरच तो डाव उलटला.
सौरव गांगुली काय म्हणाले?
सौरव गांगुली म्हणाले, “खेळपट्टी झाली कारण चार दिवसांपासून तिला पाणी घातले गेले नव्हते. जेव्हा तुम्ही पिचला पाणी देत नाही, तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होते. सुजन मुखर्जी यांना दोष देणे चुकीचे आहे. ते यासाठी जबाबदार नाहीत.” दरम्यान, खेळपट्टीवर हरभजन सिंगसह अनेक तज्ज्ञांनी टीका केली होती. परंतु गांगुलीच्या वक्तव्यांनंतर क्युरेटरवरील आरोपांपेक्षा टीम इंडियाच्या फलंदाजीतील सातत्यपूर्ण अपयशाकडेच चर्चेचा सूर वळताना दिसत आहे.
पहिल्या दोन षटकांत दोन्ही सलामीवीर आऊट
124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने पहिल्या दोन षटकांत त्यांचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल (0) आणि केएल राहुल (1) गमावले. सुंदरने ध्रुव जुरेल (13) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 32 धावा केल्या. ध्रुव जुरेल बाद झाल्यानंतर, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने फक्त दोन धावा केल्या. सुंदरने रवींद्र जडेजा (18) सोबत पाचव्या विकेटसाठी 26 धावा जोडल्या. सुंदर 31 व्या षटकात बाद झाला. अक्षर पटेलने मोठे फटके मारून धावा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने 17 चेंडूत 23 धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. भारताचा अखेर पराभव झाला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.