मीरा-भाईंदरच्या समुद्रात विषारी जेलीफिशची दहशत, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

कधी मुसळधार पाऊस तर कधी वादळी वाऱ्याचे तडाखे सहन केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मासेमारी सुरू झाली. आता तरी भरपूर मासे मिळून दोन पैसे मिळतील अशी मच्छीमारांची अपेक्षा होती. पण आता मीरा-भाईंदरच्या समुद्रात विषारी जेलीफिशची दहशत निर्माण झाली असून पुन्हा एकदा मच्छीमारांवर संकट ओढवले आहे. जाळ्यात मासळी येण्याऐवजी चक्क जेलीफिशच सापडत असल्याने मच्छीमार हैराण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

वसईच्या नायगाव, अर्नाळा, भाईंदर उत्तन भागातील अनेक मच्छीमार बांधव समुद्रात मासेमारी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलामुळे खोल समुद्रातील जेली फिश सध्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जेलीफिशचा साधा स्पर्श जरी झाला तरी अंगाची आग होते. जेलीफिशचे 27 प्रकार असून त्याचे वजन 100 ग्रॅम ते 10 किलो इतके असते. ज्या ठिकाणी जेलीफिश असतात त्याठिकाणी अन्य माशांच्या प्रजाती थांबत नाहीत. त्यामुळे मासे मिळणेही कठीण झाले असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या जेलीफिशला जाळ्यातून बाहेर काढताना खूप प्रयत्न करावे लागतात.

आर्थिक नुकसान
जाळ्यांमधून जेलीफिश काढताना अनेकदा मच्छीमारांना दुखापती होतात. या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष देऊन मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केली आहे.

विषारी जेलीफिश जाळ्यात अडकल्यावर ते जाळे फाडून टाकतात. एकाच वेळेत मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळ्यात अडकल्यामुळे जाळे समुद्रातून बोटीवर आणतानाही प्रचंड मेहनत करावी लागते. जेलीफिशमुळे जाळ्यात आलेले मासेही पुन्हा समुद्रात सोडावे लागतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. – मेलकम भंडारी, स्थानिक मच्छीमार

Comments are closed.