थोडी देशभक्ती दाखवा.

संरक्षण कंपन्यांवर सीडीएस चौहान यांनी साधला निशाणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भारतीय शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांना फटकारले आहे. या कंपन्या आपत्कालीन खरेदीच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करत नाहीत. तसेच स्वत:च्या उत्पादनांमध्ये स्वदेशी सामग्रीच्या वापरावरून अतिशयोक्तीपूर्ण दावे करत आहेत. संरक्षण कंपन्या स्वत:च्या नफ्याच्या कामांमध्ये किंचित राष्ट्रवाद आणि देशभक्ती दाखवतील अशी सैन्याला अपेक्षा असल्याचे उद्गार सीडीएस चौहान यांनी काढले आहेत.

देशांतर्गत उद्योगांना स्वत:च्या स्वदेशी क्षमतांविषयी सत्य बोलावे लागेल, कारण संरक्षण सुधारणा एकतर्फी असू शकत नाहीत. कंपन्या जेव्हा करार करतात आणि निश्चित कालावधीत सामग्रीचा पुरवठा करत नाहीत, तेव्हा हे देशाच्या क्षमतेचे नुकसान असते. सैन्याच्या आपत्कालीन खरेदीच्या 5 व्या आणि 6 व्या टप्प्यादरम्यान ही समस्या उद्भवली, तेव्हा बहुतांश भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आश्वासने दिली परंतु वेळेत पुरवठा करू शकल्या नाहीत. ही स्थिती अस्वीकारार्ह असल्याचे जनरल चौहान यांनी म्हटले आहे.

संरक्षण सुधारणा केवळ सरकार किंवा सैन्याची जबाबदारी नाही, तर यात उद्योगांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. देशांतर्गत उद्योगांना स्वत:च्या स्वदेशी क्षमतांविषयी खरे बोलावे लागेल. कंपन्या सैन्याला अर्ध्या वाटेत सोडू शकत नाहीत. जेव्हा एखादी कंपनी करारानुसार वेळेत पुरवठा करू शकत नाही तेव्हा हे देशाच्या संरक्षण क्षमतेसाठी एक मोठे नुकसान असते असे सीडीएस चौहान यांनी स्पष्ट केले.

 

Comments are closed.