दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली; 30 जणांची सुखरूप सुटका, जुन्या बांधकामांमुळे हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दिव्यातील दुमजली सावळाराम स्मृती चाळीच्या पहिल्या मजल्याची गॅलरी शनिवारी रात्री उशिरा कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या चाळीतील घरांमध्ये अडकलेल्या 30 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना घडताच महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. संपूर्ण चाळ रिकामी करण्यात आली आहे. दरम्यान दिवा, साबेगाव या भागात मोठ्या प्रमाणावर जुन्या चाळी असून त्यात राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिवा महोत्सव मैदानाजवळ तळअधिक दोन मजली सावळाराम स्मृती चाळ आहे. ती 20 ते 25 वर्षे जुनी असून चाळीत प्रत्येक मजल्यावर 7 अशा एकूण 21 सदनिका आहेत. त्यामध्ये 50 ते 55 जण राहतात. त्याच चाळीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरी शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक कोसळली. मोठ्या आवाजाने रहिवाशांची पळापळ झाली. काही जण तर जेवण झाल्यानंतर झोपण्याची तयारी करीत होते. पण या घटनेने त्यांची झोपच उडाली.

गॅलरी कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. अडकलेल्या 30 नागरिकांना शिडीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

या मदतकार्यात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही भाग घेतला. सावळाराम स्मृती चाळीतील 21 सदनिकांपैकी 9 सदनिका बंद होत्या.

सावळाराम स्मृती चाळ ही धोकादायक म्हणून ठाणे महापालिकेने जाहीर केली होती. त्यामुळे काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती. तरीही अनेक जण अशाच परिस्थितीत राहात होते. गॅलरी कोसळल्यानंतर आता महापालिकेने तिथे धोकापट्टी बांधील आहे. चाळीतील रहिवाशांनी आपली राहण्याची तात्पुरती व्यवस्था नातेवाईकांकडे केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वीही घडली होती घटना
14 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दिव्यातील संजय म्हात्रे चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला होता. यावेळी अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. त्या चाळीमध्ये एकूण 40 सदनिकांपैकी 30 सदनिका तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने रिकाम्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी पुन्हा अशीच घटना घडल्याने दिव्यातील अनेक चाळींमध्ये राहणारे रहिवासी भयभीत झाले आहेत.

Comments are closed.