प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अखेर दर्शन, मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले अनावरण

नेरुळ येथे गेल्या चार महिन्यांपासून प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज दर्शन झाले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पोलिसांचे कडे तोडून या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी शिवसैनिक आणि मनसे सैनिकांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झटापट झाली.

नेरुळ पूर्व भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा पालिकेने उभारला आहे. या पुतळ्याचे काम गेल्या चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. तेव्हापासून हा पुतळा प्ल ास्टिकचा कादग आणि नेटमध्ये गुंडाळून ठेवला आहे. या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज अनावरण केले. पुतळ्याचे अनावरण होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी पुतळा उभारण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अमित ठाकरे यांनी जलाभिषेक करून धुळीने माखलेला सर्व पुतळा धुऊन काढला आणि पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख श्रीकांत भोईर आदी उपस्थित होते.

Comments are closed.