त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर


राजन पाटील: भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) हे अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये, यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांनी केला होता. काल देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना राजन पाटील यांच्या समर्थकांनी पाठलाग केल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अनगरला भल्या पहाटे दाखल झाल्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता या प्रकरणावर राजन पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे माजी आमदार राजन पाटील म्हणाले की, मागील 40 वर्षापासून आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. तुम्ही ग्रामस्थांना विचारा, ते सांगतील, मी माझे समर्थन करेल मात्र गावकरी का करतील? इथे जन्म झालेल्या लोकांना विचारा इथे दादागिरी आहे की लोकशाही? एखादं गाव दहशतीत पाच ते दहा वर्षे चालू शकतं. मात्र दोन-दोन पिढ्या गाव दहशतीत चालू शकत नाही. अनगरचे लोक सधन आणि सुज्ञ आहेत. मात्र पूर्वजांनी एकोप्याने राहण्याचे शिकवले आहे. त्यामुळे तिसऱ्या पिढीतही दादागिरी न करता समन्वयाने बिनविरोध निवडणूक होते.

Rajan Patil: त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही

मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाची अवस्था अशी आहे की, त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष आणि पक्षाचे नेते बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लढवत आहेत. दुसरं कारण भाजपची नगरपंचायत बिनविरोध होते, यातून केलेले हे कृत्य आहे.  दोन तारखेला निवडणूक आहे. जनता जनार्दन दाखवून देईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे राजन पाटील यांनी म्हटले.

Rajan Patil: मी अजित पवारांचे नाव घेतलेले नाही

राजन पाटील पुढे म्हणाले की, निवडणूक लागल्याबद्दल आमच्या मनात कोणतेही शल्य नाही. मात्र आर आर पाटील उपमुख्यमंत्री होते, तेव्हा गाव पेटू नये म्हणून गाव एकोप्याने राहील अशी विचारधारा मांडत होते. मात्र त्याच पक्षाचे आताचे नेते राज्यात गाव पेटलं पाहिजे म्हणून काम करत असतील तर जनता आता दूध खुळी राहिली नाही. सत्ता आहे म्हणून त्याचा दुरुपयोग करत असाल तर तुम्हाला वर ठेवायचे की खाली हे जनता ठरवते. मी अजित पवारांचे नाव घेतलेले नाही, मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाला जिल्ह्यात एकही उमेदवार मिळाला नाही, अशी अवस्था आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

Rajan Patil: निवडणूक आयोगावर प्रेशर आणून ड्रामा रचला

आमच्या गावात सर्व धर्माच्या लोकांना बोलावून त्यातून उमेदवार निश्चित केले जातात. तिने (उज्ज्वला थिटे) म्हटले असते तर गावाने तिच्याही उमेदवारीबाबत विचार केला असता. पण तिला एवढं हॅमर केलं गेलं की, साप साप म्हणून सुतळीलाही धोपटले जाते. अशाप्रकारे ही निवडणूक आमच्यावर लादली गेली. म्हटलं असतं तर उमेदवारी अर्ज माघारी घेतला असता मात्र हे मी एकटं ठरवत नाही तर गाव ठरवतो. निवडणूक लादल्याचे दुःख नाही. मात्र, आमची दहा गाव एकत्र राहतात त्यांच्यात विष पेरण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची मला भीती आहे निवडणुकीची नाही. त्यांना जिल्ह्यात उमेदवार मिळत नाही म्हणून आम्ही नालायक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न काही बगलबच्चे करत आहेत. या सर्वांच्या मागे थेट अजित पवार आहेत असा आरोप आम्ही करत नाही. मात्र ज्या पद्धतीने यंत्रणा लागली आहे ते काही ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही. अगदी निवडणूक आयोगावर प्रेशर आणून कदाचित सरकारकडून मला मदत होत असेल असा त्यांचा गोड गैरसमज आहे. सरकार हे कायद्याने चालते पण काही वरिष्ठांनी निवडणूक आयोगावर प्रेशर आणून हा ड्रामा रचला आहे, असा आरोप देखील राजन पाटील यांनी केलाय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Solapur News: नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, भाजप नेत्याकडून अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठलाग? पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं

आणखी वाचा

Comments are closed.