शेअर बाजार नवा विक्रम नोंदवणार? निफ्टीने 26 हजाराचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला; गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई

अमेरिकेच्या टॅरिफनंतर शेअर बाजारावर दबाव होता. तसेच शेअर बाजार मंदीत व्यवहार करत होता. मात्र, गेल्या आठवड्यात जागिक बाजाराकडून आलेल्या सकारात्मक संकेतानंतर बाजारात तेजी दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बाजारात तेजीचा सिलसिला सुरुच होता. तसेच आता शेअर बाजाराचा एका नवा विक्रमाच्या जवळ पोहचला आहे.
सोमवारी सुरुवातीला शेअर बाजाराची सुरुवात थोडी मंदावत सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात तेजी आली आणि गुतंवणूकदारांमध्येही उत्साह दिसून आला. त्यामुळे सोमवारी सेन्सेक्स जवळजवळ ३८८ अंकांनी वाढून ८४,९५० च्या आसपास बंद झाला. तर निफ्टी १०३ अंकांनी वाढून २६,०१३ वर बंद झाला. सेन्सेक्स सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टीने पुन्हा एकदा २६,००० ची महत्त्वाची मानसिक पातळी ओलांडली. निफ्टी त्याच्या सर्वकालीन उच्चांकापासून फक्त १% दूर आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना अंदाजे ३.१६ लाख कोटींचा फायदा झाला आहे. या तेजीमुळे आता शेअर बाजार नव्या उच्चांकाचा विक्रम प्रस्थापित करणार का? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.
सोमवारी बँकिंग क्षेत्र जबरदस्त तेजीत दिसले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक जवळजवळ १.०९% वाढला. ग्राहकोपयोगी वस्तू ०.८३% वाढल्या आणि खाजगी बँकिंग क्षेत्र ०.७९% वाढले. ऑटो, वित्तीय सेवा, रिअल्टी, तेल आणि वायू, आरोग्यसेवा, मीडिया, एफएमसीजी, आयटी आणि फार्मा यासारख्या इतर क्षेत्रांमध्येही किंचित वाढ झाली. सोमवारी एकूण ४,४९७ शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी अंदाजे २,०९१ वाढीसह बंद झाले, २,२०० घसरले आणि २०६ स्थिर राहिले. ट्रेडिंग सत्रादरम्यान, १७७ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला.

Comments are closed.