बीएलओची आत्महत्या, केरळमध्ये 'एसआयआर' ठप्प
माकप जबाबदार असल्याचा काँग्रेसचा आरोप
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्सच्या विरोधामुळे सोमवारी मतदार यादीच्या विशेष फेरपडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. कन्नूरमध्ये एका बीएलओने आत्महत्या केल्यावर राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक कार्य परिषद, शिक्षक सेवा संघटनांची संयुक्त समिती आणि केरळ एनजीओ महासंघाने या प्रक्रियेवर बहिष्काराची घोषणा केली आहे. राज्यभरात बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) सोमवारी कुठलेच काम करणार नसल्याचे कर्मचारी संघटनांनी एका वक्तव्याद्वारे सांगितले आहे. तर माकप कार्यकर्त्यांच्या धमकीमुळे अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती असा आरोप काँग्रेसने केला आहे.
प्रारंभिक तपासात माकप कार्यकर्त्यांनी अधिकारी जॉर्ज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. एन्युमरेशनदरम्यान काँग्रेसचे बूथस्तरीय एजंट सोबत आल्याने जॉर्ज यांना धमकाविले जात होते. माकप कुठल्याही प्रकारे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची नावे यादीतून हटवू पाहत आहे. निवडणूक आयोगाने बीएलओची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी. बहुतांश बीएलओ महिला आहेत, प्रत्येक बूथवर 700-1200 मतदार असतात. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बीएलओंना प्रत्येक घरी पुन्हा पुन्हा जावे लागते. अशास्थितीत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे वक्तव्य राज्यातील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी केले आहे.
केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सर्व जिल्हा मुख्यालयांमध्येही संयुक्त विरोध मोर्चा आयोजित करण्यात आला. मतदारयादीच्या फेरपडताळणी प्रक्रिया आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीशी निगडित कार्य जबाबदाऱ्यांमुळे गंभीर दबावात आहोत असे कर्मचारी संघटनांचे सांगणे आहे. तर राज्यातील सर्व राजकीय पक्ष आणि अनेक संघटनांनी एसआयआर प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे, परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली आहे.
अत्यंत कमी कालावधीत मोठ्या उद्दिष्टांसह अवास्तविक जबाबदारी सोपवियणत आला आहे. ही स्थिती बीएलओंना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. कन्नूरच्या पय्यान्नूरमध्ये 44 वर्षीय बीएलओ अनीश जॉर्ज यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. एसआयआरशी निगडित कामाच्या दबावामुळे जॉर्ज यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप परिवाराचे सदस्य आणि स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते सतीशन यांनी जॉर्ज यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व बीएलआंsवर कामाचा मोठा भार आहे. निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने चौकशी करत स्पष्टीकरण द्यावे असे सतीशन यांनी म्हटले आहे.
Comments are closed.