बार्शीत शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी
मुंबई/सोलापूर: राजकारणात कोणीही कोणाचा शेवटपर्यंत शत्रू नसतो, याची प्रचिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुंषगाने राज्यभर येत आहे. कुठे दोन्ही राष्ट्रवादी (राष्ट्रवादी) एकत्र येत आहेत. कुठे महायुतीमधील भाजप-शिवसेनेत स्वबळाचे दंड थोपटले गेले आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी चाकणमध्ये दोन शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचं (Barshi) राजकारणही असंच 360 अंशात झटक्यात बदलल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या विश्वास बारबोले यांच्या पत्नीने ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, बार्शीत आता कमळ विरुद्ध मशाल अशी थेट लढत होत आहे. दरम्यान, बार्शीचे नगराध्यपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुक पुरुष उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे.
नगरपालिका निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या नाहीत. त्यामुळे, जिल्हास्तरावर या निवडणुकांसाठीचे निर्णय होतात असे भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर, नगरपालिका निवडणुकासांठी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. बार्शी नगरपालिका ही अ वर्गातील सर्वात मोठी नगरपालिका असून 42 सदस्य आणि 21 प्रभाग असलेल्या या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार, येथील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातच थेट सामना असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीचा विचार केल्यास येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या सोपल गटास पाठिंबा दिलाय, त्यामुळे बार्शीत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या. तर, काँग्रेसने स्वतंत्रपणे 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवत मतविभाजनासाठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी येथे भाजपकडून तेजस्विनी कथले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. त्यानंतर, आज शिवसेना ठाकरे गटाकडून निर्मला बारबोले यांनी शेवटच्यादिवशी उमदेवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांचे पती विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बार्शीतील नेते आहेत. मात्र, उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आमदार सोपल गटाकडून थेट मशाल चिन्हावर आपली उमेदवारी दाखल केली. त्यामुळे, कमळ विरुद्ध मशाल अशीच बार्शीची लढत पाहायला मिळेल.
राऊत गटातील 6 भाजप समर्थकांना शिवसेनेतून उमेदवारी
नगरपालिकेच्या 42 जागांसाठी सोपल गटातून शिवसेना चिन्हावर 42 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर, भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी महायुतीचा धर्म पाळत शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागा दिल्या आहेत. त्यामुळे, 36 जागांवर भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवार उभे असतील. मात्र, शिवसेना शिंदेंच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे राहणारे सहाही उमेदवार हे राजेंद्र राऊत यांचेच समर्थक आणि नगरसेवक आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या सोपल गटात आणि महायुतीच्या राऊत गटातही तडजोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, काही प्रभागांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांचा प्रचार करणारे नगरपालिकेत सोपल गटाविरोधातील उमेदवार आहेत.
हेही वाचा
बालबुद्धी म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; अमित साटमांनी मुंबईचं व्हिजन सांगितलं
आणखी वाचा
Comments are closed.