पालघर साधू हत्याकांडात आरोप केले त्याचाच हात कमळाबाईने धरला; काशीनाथ चौधरी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये

तलासरीतील एक जिल्हा परिषद जिंकण्यासाठी भाजपने आज त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाला अक्षरशः काळिमा फासला. 2020मध्ये पालघर जिह्यातील गडचिंचले गावात झालेल्या साधूंच्या हत्याकांडात भाजपने ज्या काशीनाथ चौधरींवर हत्येचा आरोप केला त्याच चौधरींना भाजपने वॉशिंग मशीनमध्ये टाकून ‘पवित्र’ केले. पण या प्रवेशाचे चांद्यापासून बांद्यापर्यंत बोंबाबोंब झाली. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी भाजपच्या बेगडी हिंदुत्वाची धुलाई केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने स्थगित करण्यात आल्याचे पत्रक काढण्याची नामुष्की ओढवली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांडावरून भाजपने राज्यभर रान पेटवले होते. पण नगरपालिका निवडणुकीत स्वतःच्या फायद्यासाठी भाजपने या हत्याकांडातील आरोपी असणाऱ्या काशिनाथ चौधरी याला पक्षात प्रवेश देत पावन करून घेतले. डहाणूत भाजपविरोधात सर्व पक्ष एकवटल्याने खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार हरिशचंद्र भोये यांच्या उपस्थितीत चौधरी याला पक्षप्रवेश देण्यात आला. यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी पालघर हत्याकांड भाजपनेच घडवले होते का, असा प्रश्न केला. चौधरी याच्या प्रवेशावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर या प्रवेशाला स्थगिती देण्यात आल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते.
मुख्यमंत्री फडणवीसांची सारवासारव
पक्ष प्रवेशाचा हा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला आहे. मला समजताच मी याविषयी माहिती घेतली. त्या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात आला आहे. त्या तपासातून काय समोर आलं ते सर्वांनी पाहिलं आहे, अशी सारवासारव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Comments are closed.