ndia अमेरिकेकडून इंधन आणि गॅस खरेदी करणार आहे

आवश्यकतेच्या 10 टक्के वायू घेण्याचा करार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताने अमेरिकेशी इंधन वायू खरेदीचा करार केला आहे. या कराराच्या अंतर्गत भारत आपल्या आवश्यकतेच्या 10 टक्के इंधन वायू (एलपीजी) अमेरिकेकडून घेणार आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा भक्कम करण्यासाठी आणि आपले पुरवठा पर्याय वाढविण्यासाठी या कराराची आवश्यकता आहे, असे भारताने करार केल्यानंतर स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडूनही कराराचे स्वागत होत आहे.

भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी हा करार अमेरिकेच्या ‘युएस गल्फ कोस्ट’ कंपनीशी केलेला असून त्याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. हा करार वर्ष 2026 या एका वर्षासाठी आहे. या एक वर्षाच्या काळात भारत या अमेरिकन कंपनीकडून 22 लाख टन इंधनवायू खरेदी करणार आहे. हे प्रमाण भारताच्या एकंदर वार्षिक आवश्यकतेच्या साधारणत: 10 टक्के आहे. अमेरिकेशी असा करार प्रथमच करण्यात आला असून या करारामुळे भारताच्या ऊर्जा आणि इंधन धोरणात महत्वाचे परिवर्तन होत असल्याचे दिसते, असे तज्ञांचे मत आहे.

किंमत निर्धारण कक्षासाठीही महत्वाचा

भारताचा अमेरिपेशी हा अशा स्वरुपाचा प्रथमच रचनात्मक करार आहे. तसेच तो अमेरिकेतील मोंट बेलव्हियू येथील वायू दर निर्धारण केंद्रासाठी ‘बेंचमार्क’ असल्याचे मानले जात आहे. या कराराची चर्चा करण्यासाठी भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसी) या कंपन्यांचे वरीष्ठ अधिकारी गेले काही महिने अमेरिकेच्या वायू पुरवठादार कंपन्यांची चर्चा करीत होते, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे.

कराराचे महत्व

भारत हा जगातील सर्वात मोठ्या वायू खरेदीदार देशांपैकी एक आहे. अशा देशाने अमेरिकेशी असा करार करावा, ही बाब ऐतिहासिक असून प्रथम भारत या कराराच्या माध्यमातून अमेरिकेच्या तेल आणि वायू बाजारात प्रवेश करत आहे. भारतातील लोकांना वाजवी दरात इंधन वायू पुरविण्याचे उत्तरदायित्व भारताच्या सरकारचे आहे. हा करार या दिशेने पडलेले एक महत्वाचे पाऊल आहे. हे या कराराचे महत्वाचे वैशिष्ट्या आहे, अशी भलावण हरदीपसिंग पुरी यांनी केली आहे.

दुसऱ्या क्रमांकाचा देश

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वायू ग्राहक देश आहे. भारतात इंधन वायूची मागणी प्रतिवर्ष सरासरी 5 टक्क्यांनी वाढत आहे. विशेषत: उज्ज्वला योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्यामुळे इंधन वायूची मागणी वाढली आहे. भारता आपल्या आवश्यकतेच्या 50 टक्के इंधन वायू आयात करतो. यापैकी बहुतेक सर्व वायू पश्चिम आशियायी देशांकडून आयात केला जात आहे.

समतोलासाठी उपयुक्त

भारताने विविध देशांकडून आपली इंधन आवश्यकता भागवून घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे बाजारात अचानक दरवाढ होण्याचे संकट नियंत्रणात राहते, असा भारताचा अनुभव आहे. केवळ मोजक्या देशांवर इंधनासाठी अवलंबून न राहता, विविध देशांशी पुरवढ्याचे करार केल्यास किंमत समतोल अधिक चांगल्या रितीने ठेवता येतो, हे भारताच्या ऊर्जा धोरणाचे महत्वाचे सूत्र आहे.

अमेरिकेशी आर्थिक संबंध महत्वाचे

या करारामुळे भारताचे अमेरिकेशी आर्थिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक व्यापार करार करण्याच्या दृष्टीने चर्चा वेगाने होत आहे. असा करार दृष्टीपथात आल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही स्पष्ट केले आहे. नुकताच झालेल्या वायू पुरवठा करार हा त्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे, असे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे म्हणणे आहे.

द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने…

ड भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध दृढ होण्यासाठी करार

ड भारताची ऊर्जा सुरक्षा वाढणार, इंधन खरेदीसाठी अधिक पर्याय उपलब्ध

ड इंधन वायू खरेदी करणारा भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश

Comments are closed.