वक्फ बोर्डाच्या विरोधात असलेल्या बेनी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली
वृत्तसंस्था/ मुनंबम
केरळमधील मुनबंम जमीन सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी जोसेफ बेनी हे दीर्घकाळापासून केरळ वक्फ बोर्डाच्या विरोधात लढाई लढत आहेत. आता जोसेफ हे काँग्रेसच्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार आहेत. मुनंबमच्या लोकांसाठी निवडणूक लढविण्याच निर्णय घेतला असल्याचे जोसेफ यांनी सोमवारी सांगितले आहे. मुनंबमच्या लोकांच्या जमिनीवर केरळ वक्फ बोर्डाने दावा केला आहे.
काँग्रेस नेत्यांनी मला निवडणूक उमेदवारीचा प्रस्ताव दिला. याप्रकरणी अन्य लोकांशी चर्चा केल्यावर मी 600 परिवारांसाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे 600 परिवार वक्फ बोर्डाच्या विरोधात लढत आहेत. माझी कुठलीच राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, परंतु मी महाविद्यालयीन दशेपासून राजकारणात सामील राहिलो आहे असे जोसेफ बेनी यांनी म्हटले आहे.
संबंधित जमीन वक्फची नसल्याचे न्यायालयानेही म्हटले आहे, परंतु राज्य सरकारने अद्याप आमचे महसूल अधिकार प्रदान केलेले नाहीत. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शने सुरू ठेवणार आहोत असे बेनी यांनी म्हटले आहे. केरळ वक्फ बोर्डाने मुनंबमच्या 400 एकर जमिनीवर दावा केला आहे. याच्या विरोधात या जमिनीवर वसलेले 600 परिवार निदर्शने करत आहेत.
एर्नाकुलम जिल्ह्याच्या वायपिन बेटावर मुनंबम किनारी भागात शेकडो एकर जमिनीवर अनेक गावे वसलेली असून तेथे पारंपरिक स्वरुपात मच्छिमार समुदायाचे लोक राहतात. येथील 404 एकर जमिनीवर केरळ राज्य वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या 600 पैकी 400 परिवार ख्रिश्चनधर्मीय तर उर्वरित हिंदूधर्मीय आहेत.
Comments are closed.