Saudi Bus Accident: हैदराबादच्या एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

सौदी अरेबियामध्ये भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत होरपळून हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 चिमुकल्यांसह 18 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. या मृतांमध्ये हैदराबाद येथील एकाच कुटुंबातील तब्बल 18 जणांचा समावेश आहे. हे संपूर्ण कुटुंब उमराहसाठी गेले असून शनिवारी परतणार होते. मात्र दुर्दैवाने या भीषण अपघातात सगळ्यांनीच आपला जीव गमावला, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
कुटुंबीयांचे नातेवाईक मोहम्मद आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना या अपघाताबाबत माहिती दिली. माझी वहिनी, मेहुणे, त्यांचा मुलगा, तीन मुली आणि त्यांची लहान मुले उमराहसाठी सौदी अरबमध्ये गेले होते. ते आठ दिवसांपूर्वी निघाले होते. त्या दिवशी उमराह पूर्ण करून ते मदिनाला परतत होते. यावेळी पहाटे दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आणि बसला आग लागली, अशी माहिती मोहम्मद आसिफ यांनी दिली.
या दुर्घटनेपूर्वी ते माझ्या आणि इतर नातेवाईकांच्या सतत संपर्कात होते, असेही आसिफ यांनी सांगितले. एकाच कुटुंबातील अठरा सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होणे ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे, असे यावेळी मोहम्मद आसिफ म्हणाले.
मृतांची नावे-
नसीरुद्दीन (70), त्यांची पत्नी अख्तर बेगम (62), मुलगा सलाउद्दीन (42), अमीना (44), रिझवाना (38), आणि शबाना (40), आणि त्यांची लहान मुले अशी मृतांची नावे आहेत.
हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू, सौदीत भीषण अपघात

Comments are closed.