ब्राह्मण, राजपूत अन् आर्यवैश्य समाजातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, कर्जव्या
महाराष्ट्र शासनाच्या योजना: विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे भरभरुन मतांचे दान पदरात पडल्यानंतर आता महायुती सरकारने (Mahayuti Government) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Bodies Election) पार्श्वभूमीवर आणखी एका योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका (Nagarpanchayat Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. हाच मुहूर्त साधत राज्य सरकारने ब्राह्मण (Brahmin), राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी ‘कर्जव्याज परतावा’ योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार या तिन्ही समाजातील निवडक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरवर्षी व्यवसाय आणि उद्योगासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल. या कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडल्यास लाभार्थ्यांना व्याजाची रक्कम परत मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या या योजनेमुळे ब्राह्मण, राजपूत अन् आर्यवैश्य समाजातील तरुणांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राज्य सरकारने ब्राह्मण समाजाला आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठीचे नोकरी व शिक्षणात 10 टक्के आरक्षण देऊ केले होते. यानंतर पहिल्यांदाच ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक योजना सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने परशुराम महामंडळाची स्थापना केली होती. या महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक करुन 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजना सुरु केली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर राजपूत, आर्य वैश्य अशा विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन केली होती. त्यामध्ये राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप, आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका आर्थिक महामंडळाची स्थापन करण्यात आली होती. मात्र, ही महामंडळे फक्त कागदावरच राहिली होती. परंतु, आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या महामंडळांच्या माध्यमातून ब्राह्मण, राजपूत आणि आर्य वैश्य समाजासाठी स्वतंत्र आर्थिक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
Loan Interest waiver scheme: ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी असलेल्या कर्जव्याज योजनेचा काय फायदा होणार?
महायुती सरकारने ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी घोषणा केलेल्या कर्जव्याज परतावा योजनेनुसार, तिन्ही समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज दिले जाईल. दरवर्षी 50 लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानुसार 15 लाखांपर्यंतच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास महामंडळाकडून भरलेल्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. व्याज परताव्याची कमाल मर्यादा साडेचार लाख रुपये इतकी असेल. तसेच गट कर्ज परतावा योजनेतंर्गत 50 लाखांपर्यंत मंजूर झालेल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडल्यास महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जातील. गट कर्ज परतावा योजनेची कमाल मर्यादा 15 लाख रुपये इतकी असेल. मात्र, त्यासाठी लाभार्थ्याने बँकांना हप्ता भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
आणखी वाचा
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी
आणखी वाचा
Comments are closed.