Asia Cup Rising Stars: इंडिया ए चा शेवटचा लीग सामना; जिंकले तर सेमीफायनल, हरले तर बाहेर!
ACC आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत आज इंडिया ए संघाचा शेवटचा लीग सामना ओमानविरुद्ध दोहा (कतर) येथे रंगणार आहे. हा सामना जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय तरुण संघासाठी अक्षरशः करो या मरो आसा आहे. कारण हा सामना हरला तर भारताची मोहीम इथेच संपणार असून संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही. मात्र विजय मिळाल्यास सेमीफायनलचे तिकीट पक्कं होईल.
भारतीय संघाने यापूर्वी दोन सामने खेळले असून त्यापैकी एका सामन्यात टीम इंडियाने यूएईवर मोठा विजय मिळवला होता. परंतु पाकिस्तान ए विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानकडून मिळालेला हा धक्का भारतीय संघ भरून काढू शकतो, पण त्यासाठी प्रथम ओमानविरुद्ध आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यानंतरच सेमीफायनलमध्येही दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारता येईल.
ग्रुप बी मध्ये पाकिस्तान ए ने आधीच सेमीफायनलचे तिकीट आपल्या नावे केले आहे. त्यामुळे इंडिया ए आणि ओमान यांच्यातील सामना हा ‘नॉकआउट’ स्वरूपाचा ठरणार आहे. जो संघ विजय मिळवेल त्याचं पुढे स्थान पक्कं होणार आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये विजय मिळवावा लागेल. ग्रुप ए मध्ये बांग्लादेशने दोन विजयांसह सेमीफायनलकडे मोठी झेप घेतली आहे, तर श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए ही शर्यतीत टिकून आहेत.
या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्याने पहिल्याच सामन्यात विस्फोटक शतक ठोकले. पण पाकिस्तान विरुद्ध तो मोठी खेळी करु शकला नाही.
Comments are closed.