हॉटेलमधील पदार्थाची चव सारखीच राहते घरचं जेवण ‘हॉटेलसारखं’ का लागत नाही? ‘या’ सेलिब्रिटी शेफनी दिला परफेक्शनचा खरा मंत्र

आपण हॉटेलमध्ये एखादा आवडता पदार्थ खातो आणि वर्षांनी गेलो तरी त्याच चवीचा अनुभव पुन्हा मिळतो. पण घरी तोच पदार्थ बनवला तर चव कधी जुळते, कधी नाही. आणि मग नकळत आपणच म्हणतो, “हॉटेलसारखं होतच नाही…” अनेक गृहिणींच्या मनातला हा नेहमीचा प्रश्न. नेमकं हॉटेलमध्ये एवढं अचूक, सारखं आणि परफेक्ट कसं बनतं? याच गोष्टीचं उत्तर सेलिब्रिटी शेफ तुषार देशमुख यांनी ‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत दिलं. (chef kitchen tips how hotels maintain same taste)

हॉटेलमध्ये एखादा पदार्थ खाल्ला की त्याची चव नेहमी सारखीच असते. कितीही महिन्यांनी खाल्ली तरी तीच चव, तोच फ्लेव्हर. पण घरी तोच पदार्थ केला तर कधी चांगला होतो, कधी थोडा बदलतो. या चवीतील फरकावर बोलताना सेलिब्रिटी शेफ तुषार देशमुख म्हणाले की, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या परफेक्शनमागे एकच गोष्ट असते ऍक्यूरसी, म्हणजेच अचूकता.

ते म्हणतात, “हॉटेलमध्ये कोणताही पदार्थ बनवताना मोजमाप, वेळ, मसाले, पद्धत सगळं अगदी ठरलेलं असतं. त्यात अंदाज नसतो. म्हणून चव बदलत नाही. पण घरी आपण बहुतेक वेळा ‘अंदाजाने’ स्वयंपाक करतो, आणि तिथेच चवीत बदल होतो.”

आज यूट्यूबवर एका पदार्थाच्या हजारो रेसिपी मिळतात. पण हॉटेलच्या चवीशी त्या का जुळत नाहीत? यावर ते म्हणाले, “शेफ तुम्हाला रेसिपी सांगतात, काहीही लपवत नाहीत. पण घरी पहिल्याच प्रयत्नात ती चव मिळाली नाही की आपण नकारात्मक प्रतिक्रिया देतो. ‘नाही जमलं’, ‘हॉटेलसारखं होत नाही’ असं म्हणत प्रयत्न सोडून देतो. इथंच आपण चुकतो.”

तुषार देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, “एकाच रेसिपीचा 4–5 वेळा सराव केला तर घरी पण तशीच ऍक्यूरसी तयार होते. पण आपण पहिल्याच प्रयत्नात निराश होतो आणि थांबतो. सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, तर घरी केलेला पदार्थ हॉटेलपेक्षा ही चविष्ट होऊ शकतो.”

ते पुढे पाणीपुरीचं उदाहरण देतात. “भैयाकडची पाणीपुरी जास्त टेस्टी वाटते, पण घरी कधी कधी छान होते, कधी नाही. कारण घटक तेच असले तरी प्रमाणाची अचूकता वारंवार करताना आपल्याकडे विकसित होत नाही. पण प्रयत्न सुरू ठेवला तर घरची चवही परफेक्ट हवी तशी होते.” मात्र प्रयत्न सोडला तर घरची चव कधीच हॉटेलला भिडणार नाही सराव करत रहाल तर एकदा नाही दोनदा नाही दहाव्यावेळेला का होईना तो पदार्थ तुम्हाला आवडतो तसा होणारच पण प्रयत्न सोडायचे नाहीत कारण प्रयत्न सोडणं म्हणजेच हार.” ‘म्हणून ऍक्यूरसी, परफेक्शन आणि पॉझिटिव्हिटी हे तीन मंत्र आत्मसात केले तर घरचं जेवणही हॉटेलपेक्षा कमी नाही. सातत्य ठेवलं तर चवही कायम राहते.’

Comments are closed.