प्रशिक्षक गंभीर यांचा हट्ट टीम इंडियाला महागात? गरजेपेक्षा जास्त बदलांमुळे संघाचं मोठं नुकसान

साल 2024 मध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला भारतात पहिल्यांदाच 3-0 ने हरवलं होतं. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्येही भारतीय टीमची कामगिरी खराबच राहिली. गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांनी जेव्हा हेड कोच म्हणून जबाबदारी घेतली, तेव्हा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कपही आपल्या नावावर केला.

पण फलंदाजी ऑर्डरमध्ये सातत्याने बदल करण्याचा गंभीर यांचा हट्ट आता भारतीय टीमला महागात पडत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर साई सुदर्शनऐवजी (Sai surdarshan) वॉशिंगटन सुंदरला नंबर 3 वर पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. इतकंच नाही तर हा निर्णय चाहत्यांनाही अजिबात समजला नाही.

गंभीर यांनी कोचिंगची जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी सतत बदलांची मालिका सुरू ठेवली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये अभिषेक शर्माला घेण्यात आलं आणि त्याचा जोडीदार म्हणून सुरुवातीला संजू सॅमसनला (Sanju Samson) प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्यात आलं. या दोघांची जोडी छान जमली आणि त्यांनी अनेक मालिकांमध्ये चांगली कामगिरीही केली.

पण आशिया कपच्या आधी शुबमन गिलला (Shubman gill) या कॉम्बिनेशनमध्ये आणलं गेलं, आणि संजूला पाचव्या नंबरवर ढकललं गेलं. हा निर्णय चुकला. याचा परिणाम फक्त टॉप ऑर्डरवर नाही तर मध्यल्या फळीतील क्रमावरही झाला.

अशीच परिस्थिती कर्णधार सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादवच्या फलंदाजी पोजिशनबाबतही दिसून आली. सूर्या नंबर तीनवर सर्वाधिक प्रभावी ठरला होता, पण त्याला वारंवार नंबर चार किंवा पाचवर पाठवलं गेलं. त्यामुळे त्याच्या खेळातील चमक कमी होत चालली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला बॅटिंगला पाठवलं आणि याचाही फटका टीमला बसला. फक्त संजू किंवा दुबे नव्हे, तर अनेक खेळाडूंच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सतत बदल होत आहेत. त्यामुळे टी-20 मध्ये कोण कुठे खेळणार हे चाहत्यांसाठी कोडंच झालं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर साई सुदर्शनला टीममध्ये आणलं गेलं. त्याने नंबर तीनवर चांगल्या खेळीही केल्या. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये साई सुदर्शनलाच ड्रॉप करण्यात आलं आणि त्या जागी वॉशिंगटन सुंदरला नंबर तीनवर पाठवण्यात आलं.

सुंदर ना तर फलंदाजीत चमकला, ना त्याला गोलंदाजीची संधी मिळाली. पहिल्या डावात त्याने फक्त एकच षटक टाकलं, तर दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करण्याची संधीच देण्यात आली नाही.

कधी प्लेइंग 11 मध्ये अनावश्यक जास्त वेगवान गोलंदाज असतात, तर कधी पिचचा विचारही न करता एकाच वेळी चार फिरकीपटूंना उतरण्याचा निर्णय घेतला जातो. या सगळ्याचा सर्वात मोठा फटका टीमच्या बॅटिंग ऑर्डरला बसला आहे. सतत पोजिशन बदलल्यामुळे इन-फॉर्म फलंदाजही आपल्या सर्वोत्तम खेळू शकत नाहीत, आणि त्याचा तोटा टीमलाच सहन करावा लागतो.

Comments are closed.