Ratnagiri Municipal Council Election- नगराध्यक्ष पदाचा एक, नगरसेवक पदाचे दहा अर्ज बाद

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी छाननी केली. यात अर्धवट माहिती भरल्यामुळे एक नगराध्यक्ष व दहा नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर दोन अर्जावर आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्यावर सुनावणी झाली. यात उमेदवार केतन शेट्ये व फरजाना मस्तान यांचा अर्ज वैध ठरला आहे.
मंगळवारी (18 नोव्हेंबर 2025) झालेली छाननी प्रक्रिया तीन वाजेपर्यंत चालली. यावेळी काही अर्ज अर्धवट माहिती मुळे अवैध ठरले तर दोन उमेदवारांविरोधात आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्यावर सुनावणी घेण्यात आली. यात प्रभाग 4 ब मधून केतन उमेश शेट्ये यांच्या विरोधात मालमत्ता कर भरला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. यासाठी 8 नोव्हेंबर रोजी नगर पालिकेने काढलेली नोटीसचा आधार घेण्यात आला होता. याबाबत शेट्ये यांच्या ॲड. हर्षवर्धन गवाणकर यांनी बाजू मांडली. नोटीस मिळाल्यानंतर मालमत्ता कर नगर पालिकेत भरण्यात आला असून, नगर परिषदेने याबाबत नाहरकत प्रमाणपत्र दिलेले असल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. या आक्षेपावर निर्णय देताना केतन शेट्ये यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. तर फरजाना इरफान मस्तान या महिला उमेदवाराविषयीही आक्षेप नोंदवण्यात आला असून सायंकाळी उशिरा त्यांच्या अर्ज वैध ठरवण्यात आला.
छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठीचा एक अर्ज आणि नगरसेवकपदासाठीचे दहा अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी सहा आणि नगरसेवकपदासाठी 122 अर्ज वैध ठरले असून, 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे.

Comments are closed.