मी गौती भाईंच्या मताशी सहमत..’ पुजाराची ईडन पिचवर वेगळीच भूमिका! फलदाजांच्या तयारीवर केलं मोठं विधान

ईडन गार्डन्समध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर, टीम इंडिया त्या पराभवाच्या चर्चेतून बाहेरच पडत नाही. आणि ही चर्चा इतक्या लवकर थांबणारही नाही. अगदी तशीच परिस्थिती जशी गेल्या वर्षी न्यूझीलंडकडून मिळालेल्या 3-0 च्या पराभवानंतर निर्माण झाली होती, तो धक्का आजही कोणताही भारतीय कसोटीप्रेमी विसरू शकलेला नाही.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजी दिग्गज खेळाडूंच्याच मतांमध्ये ईडनच्या खेळपट्टीबाबत विरोधाभास दिसतो आहे. एक दिवस आधीच महान सुनील गावस्कर (Sunil Gavaskar on gautam gambhir) यांनी हेड कोच गौतम गंभीर यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले होते. पण दुसरीकडे माजी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) मात्र गंभीर यांच्या बोलण्याशी अजिबात सहमत नाही.

गंभीर यांनी म्हटले होते की, खेळपट्टीमध्ये काही दोष नव्हता आणि पराभवाचे खापर पूर्णपणे भारतीय फलंदाजांवर फोडले होते, पण पुजारा यावर ठामपणे असहमत आहे.

जिओस्टारवर तज्ज्ञ म्हणून बोलताना पुजारा म्हणाला, गौती भाईंच्या या मताशी मी सहमत नाही की भारतीय फलंदाजांच्या संघर्षात खेळपट्टीचा काही भाग नव्हता. त्याने म्हटलं की टीमला अशाच परिस्थिती हव्या होत्या, पण प्रत्यक्षात या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड होते. टेंबा बावुमा वगळता एकही फलंदाज पन्नासजवळ गेला नाही. अशा प्रकारच्या खेळपट्टीसाठी भारतीय फलंदाजांची तयारी अपुरी होती.

तो पुढे म्हणाला की, अशा खेळपट्टीवर फलंदाजांचं शॉट सिलेक्शन पूर्णपणे वेगळं असायला हवं.

पुजारा म्हणाला, टर्निंग ट्रॅकवर वेगळ्या प्रकारचे शॉट सिलेक्शन करावे लागते. येथे अधिक स्वीप शॉट्स खेळावे लागतात आणि स्कोअरबोर्ड चालू ठेवण्यासाठी सकारात्मक भावनेने फलंदाजी करावी लागते. भारताला अशा टर्निंग पिचेस आवडत असतील, तर सामान्य खेळपट्टी बाजूला ठेवून या खास परिस्थितीचा विचार करूनच फलंदाजांनी तयारी करायला हवी.

भारताची ‘दुसरी भिंत’ म्हणून ओळखले जाणारा पुजारा पुढे म्हणाला, काही विकेट्स फलंदाजांच्या चुका झाल्यामुळेही पडल्या, पण याचा अर्थ असा नाही की खेळपट्टी सोपी होती. टेंबा बावुमाने दाखवले की अशा खेळपट्टीवर धावा करता येतात, पण त्यासाठी वेगळ्या शैलीत खेळावे लागते. स्वीप शॉट्स खेळावे लागतात आणि सकारात्मक मानसिकतेने फलंदाजी करावी लागते. ईडनची ही खेळपट्टी नेहमीसारखी सरळ-सरळ खेळण्याला पाठिंबा देत नाही. खेळपट्टी स्पिनर्सला मदत करत असेल, तर फलंदाजांनी स्वीप आणि हवेत शॉट्स खेळत मोजून-तोलून धोका पत्करावाच लागतो.

Comments are closed.