गणपतीपुळे समुद्रात पर्यटक का बुडतात यांचा तांत्रिक बाजूने अभ्यास करा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, प्रशिक्षीत मनुष्यबळ, गृहरक्षक दल, पोलीस, धोका दर्शक झेंडे, नो-स्विमिंग झोन, सातत्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असल्याने तांत्रिक समिती नियुक्त करून अभ्यास करा, ब्रेथ ॲनालायझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई यासारख्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सर्वांचे योगदान असावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या. गेल्या महिन्याभरात गणपतीपुळे समुद्रात चार दुर्घटना घडल्या आहेत.
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. त्यासाठी एखादी तांत्रिक एजन्सी नेमून अभ्यास करावा व त्यामार्फत कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. सद्यस्थितीमध्ये एलईडी स्क्रीन लावून पर्यटकांसाठी काय करावे, काय करु नये याच्या सूचना द्याव्यात. वॉच टॉवरची संख्या आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ वाढवावे. लाऊड स्पिकरवरुन वारंवार सूचना तसेच माहितीची उद्घोषणा करावी. गृह रक्षक दल आणि पोलीसांची मदत घेऊन ब्रेथ ॲनालाइझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई करावी. अपघात थांबविण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण शून्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपले योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडूण्याच्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, ग्रामसेवक प्रविण चौधरी, सरपंच कल्पना पकये, गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष निलेश कोलटकर, पंच श्रीराम केळकर, खजिनदार अमित मेहंदळे, मोरया वॉटरस्पोर्टसचे अध्यक्ष उदय पाटील, ग्रामसदस्य राज देवरुखकर आदी उपस्थित होते.
Comments are closed.