ऍड. असीम सरोदे यांच्या सनद निलंबनाला स्थगिती, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयामुळे दिलासा

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ऍड. असीम सरोदे यांना मंगळवारी बार कौन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला. सरोदे यांची सनद निलंबित करण्याच्या महाराष्ट्र आणि गोवा बार कान्सिलच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरोदे हे न्यायालयात वकील म्हणून पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करू शकणार आहेत.

ऍड. सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या त्रिसदस्यीय समितीने त्यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित केली होती. त्या निर्णयावर ऍड. सरोदे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता आणि कायदेशीर लढाई सुरू केली होती. त्यांच्या आक्षेपाची नोंद घेत बार कौन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निर्णयाला स्थगिती दिली.

सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे आभार. मी पुन्हा येतोय… कोर्टात भेटू!

गेल्या वर्षी जानेवारीत शिवसेनेने वरळीत ‘जनता न्यायालय’ भरवले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल ऍड. सरोदे यांनी सोप्या शब्दांत मांडला होता. त्यांच्या विधानातून न्यायव्यवस्था, राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांचा अपमान झाल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्याने केली होती. मात्र आता सनद निलंबनाला स्थगिती दिल्याने सरोदे यांना न्यायालयात युक्तिवाद करता येणार आहे.

Comments are closed.