मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट – स्फोट करण्याचा इशारा, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले

महायुतीमधील घटक पार्टी असणाऱ्या शिंदे गटाची भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकेबंदी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे होत असलेल्या घुसमटीचा आज स्फोट झाला. मिंध्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकत आपली मळमळ बाहेर काढली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपकडून युतीचा धर्म पाळला जात नाही, असे सांगत शिंदे गटावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच तुम्हीच उल्हासनगरमधून सुरुवात केली. तुम्ही केले ते चालते, आम्ही केले त्याला वाईट म्हणता! टाळी एका हाताने वाजत नाही, मर्यादा पाळा मग बघू, असे सांगत मिंध्यांच्या मंत्र्यांना उडवून लावले.

भाजपकडून राज्यात मागील काही दिवसांपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. शिंदे गटाचे मंत्री व आमदार असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातच विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, रायगड आदी ठिकाणी विरोधकांबरोबर शिंदे गटाचे प्रमुख नेत्यांना ठरवून भाजपमध्ये प्रवेश देऊन शिंदे गटाची राजकीय नाकाबंदी सुरू आहे. हे कमी म्हणून की काय भाजपच्या मंत्र्यांकडील विभाग आणि पालकमंत्री असलेल्या ठिकाणी निधी मिळविण्यासाठी शिंदे गटाच्या मंत्री आमदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे शिंदे गटात असलेल्या अस्वस्थतेमुळे मिंध्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली.

यांची मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, योगेश कदम या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली.

प्री कॅबिनेटमध्ये झाला बहिष्कार घालण्याचा निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीआधी झालेल्या प्री कॅबिनेटमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांनी  आम्हाला जर अधिकार, निधी वाटप, अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील तर बैठकीला येऊन उपयोग काय, असा नाराजीचा सुरू आळवत भाजपच्या मंत्र्यांविरोधात भूमिका मांडली. तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे मी कॅबिनेट बैठकीला जातो,’ असे म्हणून शिंदे बैठकीला गेले.

यांच्या भाजप प्रवेशामुळे भुसे, शिरसाट, शंभुराज देसाई अस्वस्थ

मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात अद्वय हिरे, संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील राजू शिंदे, शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांना भाजपने प्रवेश दिल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. स्नेहल जगताप यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे मंत्री भरत गोगावले, सुधाकर घारे यांच्या प्रवेशामुळे आमदार महेंद्र दळवी यांना असुरक्षित वाटू लागले आहे.

पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं लागेल -फडणवीस

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण करत असल्याची तक्रार शिंदेंच्या मंत्र्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्या जिह्यात कोणते प्रवेश झाल्याची यादीच त्या मंत्र्यांना वाचून दाखवली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं लागेल, असे खडे बोल फडणवीस यांनी सुनावले.

शिंदे गटात नाराजी नाही – उदय सामंत

शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही. आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याबाबत आम्ही एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे न्याय मागतो. शिंदे गट आणि भाजप युती आहे. त्यामुळे यापुढे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिंदे गटात आणि शिंदे गटातील लोकांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत झाला. वाद निर्माण होईल असे आपल्याकडून कुठेही होता कामा नये, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी रात्री पत्रकार परिषद घेऊन दिली.

ठाण्यात शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदे यांना ठाणे जिह्यात शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे ठाणे, पालघर, कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला आहे, तर रवींद्र चव्हाण शिंदे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावून भाजपमध्ये प्रवेश देत आहेत. यामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे.

उल्हासनगरमध्ये काय घडले?

उल्हासनगरमध्ये शिंदे गटाची कलानी गटासोबत युती आहे. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना शिंदे गटात प्रवेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या चार ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी कलानी गटात प्रवेश केला. शिंदे गटाच्या मदतीने हे सर्व घडले. यात माजी जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, महेश सुखरामानी आणि राम पारवानी यांचा समावेश आहे. स्थानिक निवडणुकांची आणि पक्ष संघटनांची मदार या माजी नगरसेवकांवर होती. त्यामुळे भाजपला हादरा बसला.

g कुणी कुणाला झापलं आणि चापलं असं झालं नाही. समजूतदारपणाने यामधून मार्ग काढण्यात आला. आता आम्ही स्फोट करणार आहोत तो पाहा, असं मंत्री भरत गोगावले फडणवीसांच्या भेटीनंतर म्हणाले. आमची नैसर्गिक युती असलेल्या पक्षासंबंधी हा स्फोट नसेल. यापुढे रायगडमध्ये जशास तसं उत्तर दिलं जाणार, असा इशारा त्यांनी सुनील तटकरेंचे नाव न घेता यावेळी दिला.

भाजपकडून बलात्कार बापू भडकले

भाजपचे सध्या सुरू असलेले राजकारण हे हिडीस, किळसवाणे, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्याप्रमाणे आहे. अशा प्रकारचे राजकारण सुरू राहिले तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल, असा संताप शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

बाहेर होते किंवा मरण पावला – वडेट्टीवार कावले

शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना, त्यांचे दुःख हे मनातून आलेलं आहे. त्याची कळ ही किती भारी आहे, हे भविष्यात दिसेल. जेव्हा ही कळ असह्य होईल तेव्हा उपचारासाठी त्यांना महायुतीतून बाहेर पडावे लागेल किंवा मरावे लागेल. हे दोनच पर्याय त्यांच्याकडे असल्याचे कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

शिंदे गटाचे मंत्री च्या रागावला आहेत?

  • भाजप शिंदे गटाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षात घेत आहे.
  • शिंदे गटाचे मंत्री व आमदारांनी ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजपची दारे उघडली आहेत.
  • शिंद गटाचे मंत्री व पालकमंत्र्यांना  विश्वासात न घेता निधी वळवला जातो.
  • छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, नाशिक, अंबरनाथ या ठिकाणी भाजपने प्रवेश करून घेतले.

हे तुम्हीच उल्हासनगरातून सुरू केलेय, तुम्ही केलंत ते चाललं आणि आम्ही केलं त्याला वाईट म्हणता. टाळी एका हाताने वाजत नाहीमर्यादा पाळा, मग पुढचं पुढे बघू – मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

Comments are closed.