भारतात ई-पासपोर्ट युग सुरू होत आहे
सुरक्षितता, अचूकता यांच्या दृष्टीने अधिक बळकट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतात आता नव्या आधुनिक पद्धतीच्या पासपोर्टस्च्या युगाचा प्रारंभ झाला आहे. नव्या पासपोर्टमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी परिवर्तने करण्यात आली आहेत. इंटरलॉकिंग पद्धतीची लघुअक्षरे, रिलीफ टिंटस् आणि धारकाची माहिती असणाऱ्या एंबेडेड आरएफआयडी चिप्स अशी या नव्या पासपोर्टस्ची वैशिष्ट्यो आहेत. या पासपोर्टस्चे वितरण करण्यास मे 2025 पासून प्रारंभ करण्यात आला. यानंतरच्या काळात जुन्या पद्धतीचे पासपोर्टस् वितरीत केले जाणार नाहीत. मात्र जुने पासपोर्टस् त्यांचा कालावधी संपेपर्यंत वैध मानले जाणार आहेत. नवे पासपोर्टस् ई-पासपोर्टस्च्या पद्धतीने दिले जाणार आहेत. जून 2035 पर्यंत सर्व जुने पासपोर्टस् कालबाह्या पेले जाणार असून त्यांचे स्थान नव्या पासपोर्टस्कडून घेतले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून दिली गेली आहे. या नव्या ई-पासपोर्टस्ची अनेक महत्वपूर्ण वैशिष्ट्यो असून त्यांच्यामुळे धारकांना अधिक सुविधा प्राप्त होणार आहेत, असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र विभागाने केले आहे.
रेडिओ फ्रिक्वेन्सी चिप
नव्या पासपोर्टस्मध्ये धारकाची बायोमेट्रिक माहिती असणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप बसविण्यात आली आहे. तसेच ‘अँटेना’ही बसविण्यात आला आहे. त्यांच्यामुळे धारकाची सर्व व्यक्तीगत आणि बायोमेट्रिक माहिती अतिशय सुरक्षित राहणार आहे. धारकाचे छायाचित्र, फिंगरप्रिंटस् इत्यादी डिजिटल स्वाक्षरीच्या स्वरुपात साठविण्यात आलेली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी विमान प्रवास मानके उपयोगात आणण्यात आली आहेत, असे दिसून येते.
स्पर्शविहीन वाचन
स्पर्शविहिन माहिती वाचन (काँटॅक्टलेस डाटा रिंडींग) सुविधेमुळे स्थलांतरण काऊंटर्सवर धारकाची ओळख पटविण्याचे काम सुलभ पद्धतीने आणि वेगवानपणे होणार आहे. यामुळे घोटाळे, टँपरिंग, फ्रॉड इत्यादींना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. तसेच स्पर्शविहीनतेची सोय असल्याने पासपोर्टची झीज किंवा विअर-अँड-टिअरही होणार नाही. आतापर्यंत भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने अशा प्रकारचे 80 लाख ई-पासपोर्टस् देशांतर्गत वितरीत केले असून विदेशांमधील भारतीय दूतावासांच्या माध्यमांमधून 60 हजार पासपोर्टस्चे वितरण झाले आहे.
बनावट पासपोर्टना आळा बसणार
नव्या पद्धतीच्या ई-पासपोर्टस्चे डुप्लिकेशन करणे (बनावट पासपोर्ट बनविणे) अशक्य आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार विभागाने केले आहे. तसेच एका व्यक्तीजवळ एकाहून अधिक पासपोर्टस् असण्याची शक्यता सुद्धा नाहीशी होणार आहे. कोणीही नवा पासपोर्ट काढण्यासाठी आल्यानंतर त्याची सर्व बायोमेट्रिक माहिती एका मध्यवर्ती सर्व्हरवर पडताळून पाहिली जाणार आहे. त्यामुळे या माहितीच्या आधारावर आधी पासपोर्ट काढण्यात आला असेल, तर ते त्वरित समजणार आहे. यामुळे अनेक पासपोर्ट असण्याची शक्यता मावळणार आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाधारित तंत्रज्ञान
या पासपोर्टस्चा प्रारंभ मे 2025 पासून करण्यात आला आहे. याला पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 असे संबोधण्यात आले आहे. नवे पासपोर्टस् कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाधारित (एआय ड्रिव्हन) आहेत. त्यांचे वितरण देशातील सर्व 37 विभागीय पासपोर्ट वितरण केंद्रांमधून केले जात आहे. तसेच देशभरातील 451 पोस्ट कार्यालयांमधील पासपोर्ट सेवा विभागांमधूनही त्यांचे वितरण केले जात आहे. नव्या पासपोर्ट यंत्रणेची जोडणी एआयआधारित चॅनबॉट आणि व्हॉईसबॉटशी करण्यात आली आहे. यामुळे पासपोर्टसाठी आवेदन सहजगत्या करता येणार असून अडचण निवारणही वेगवान पद्धतीने केले जाणार आहे. पासपोर्टसाठी ऑनलाईन कागदपत्रे, ऑटो फील्ड फॉर्मस्, युपीआरबेस्ड पेमेंटस् आदी सोयीही आहेत.
नवी यंत्रणा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त
- बनावाट पासपोर्ट बनविणे नव्या ई-पासपोर्ट पद्धतीमुळे अशक्य होणार
- एका व्यक्तीजवळ एकापेक्षा अधिक पासपोर्ट असण्याचे प्रकार संपणार
- पासपोर्ट देताना होणारे घोटाळे, भ्रष्टाचार, फ्रॉड आदींना आळा बसणार
- ऑन लाईन प्रक्रियेमुळे पासपोर्ट काढणे अधिक वेगवान, सुविधाजनक
- धारकाची सर्व बायोमेट्रिक माहिती अतियश सुरक्षित राहण्याची व्यवस्था
- पासपोर्टला स्पर्श न करता माहिती वाचण्याच्या सोयीमुळे टिकावूपणा
- एकाच मध्यवर्ती सर्व्हरवर पडताळणी होत असल्याने सुरक्षितता अधिक
- जून 2035 पर्यंत जुने पासपोर्ट कालबाह्या, सर्वांसाठी नवे पासपोर्ट
Comments are closed.