वैभव सूर्यवंशीची बॅट शांत, पण टीम इंडिया दणक्यात सेमीफायनलमध्ये! उपांत्य फेरीत कोणाशी भिडणार?
टीम इंडिया सेमी-फायनल आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 : टीम इंडिया अ संघानं ओमान अ संघाचा 6 विकेटांनी पराभव करून आशिया कप रायझिंग स्टार्स 2025च्या उपांत्य फेरीत धमाकेदार प्रवेश केला. ग्रुप बीतून उपांत्य फेरी गाठणारी टीम इंडिया ही दुसरी टीम ठरली. यापूर्वी पाकिस्तानने सेमीफायनल गाठली होती. दोहामध्ये झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ओमानने 20 षटकांत 7 बाद 135 धावा केल्या. प्रत्युत्तर टीम इंडिया अ संघानं 17.5 षटकांत 138 धावा करत सहज विजय मिळवला. भारतासाठी हर्ष दुबेने नाबाद अर्धशतक झळकावले.
उपांत्य फेरीचं समीकरण
कर्णधार जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अ संघानं ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी 2 सामने जिंकले. त्यांच्याकडे 4 गुण आणि 1.979 असा नेट रन रेट राहिला. पाकिस्तानने सर्व 3 सामने जिंकून 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीत टीम इंडिया अ संघाचा सामना ग्रुप ए संघातील पहिल्या क्रमांकाच्या संघाशी होईल, तर पाकिस्तानचा सामना त्या ग्रुपमधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे. दोन्ही उपांत्य सामने 21 नोव्हेंबरला याच मैदानावर खेळले जातील, पहिला सामना दुपारी 3 वाजता आणि दुसरा सामना रात्री 8 वाजता.
हर्ष दुबेचं नाबाद अर्धशतक; भारताच्या विजयाचा हिरो
137 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. 17 धावांवर पहिला धक्का बसला. शाफिक जानने प्रियांश आर्याला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर वैभव सूर्यवंशी 12 धावा करून आऊट झाला. या संकटातून भारताला बाहेर काढण्याचं काम चौथ्या क्रमांकावर आलेल्या हर्ष दुबेनं केलं. त्यानं फक्त 41 चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि 44 चेंडूत नाबाद 53 धावा करून संघाला विजयाच्या किनाऱ्यावर पोहोचवलं. नमन धीर (30) आणि नेहल वढेरा (23) यांनीही महत्त्वाची साथ दिली. ओमानसाठी ओडेड्रा, शाफिक, समय आणि आर्यन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सामना जिंकणाऱ्या अर्धशतकासह त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी, हर्ष दुबे सामनावीर ठरला. 👏
या विजयासह भारत अ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. 👍
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/F9u6OP8Yqd#RisingStarsAsiaCup pic.twitter.com/Yeb4qMIr0k
— BCCI (@BCCI) 18 नोव्हेंबर 2025
वसीम अलीचं अर्धशतक
नाणेफेक हरल्यानंतर ओमानने करन सोनावले आणि हम्माद मिर्झाच्या जोरावर चांगली सुरुवात केली. दोघांनी 37 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विजयकुमार विशकने कर्णधार मिर्झाला 32 धावांवर बाद केले. वसीम अलीने संघर्ष करत 54 धावांची नाबाद खेळी साकारून संघाला 130 धावांपार नेण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, ओमानचे तीन फलंदाज दहाच्या पुढे जाऊ शकले नाहीत आणि दोन फलंदाज शून्यावर परतले. भारतासाठी गुरजपनीत सिंह आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर विजयकुमार विशक, हर्ष दुबे आणि नमन धीर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.