संतुलित करारानंतरच चांगली बातमी येईल.
भारत-अमेरिका करारासंबंधी गोयल यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंबंधी चर्चा होत आहे. तथापि, यासंबंधीची शुभवार्ता तेव्हाच येईल, जेव्हा एका समतोल आणि उभयपक्षी समझोत्याला दोन्ही देशांची मान्यता मिळेल, असे वक्तव्य भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. ते येथे ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ या संस्थेच्या शिखर परिषद कार्यक्रमात भाषण करीत होते. त्यांनी सध्या दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या व्यापार करारासंबंधीची माहिती उपस्थितांना दिली.
भारत हा एक मोठा देश आहे. आम्हाला आमच्या लोकांचे हिताचे रक्षण केले पाहिजे. भारतातील शेतकरी, अतिलघु, लघु, आणि मध्यम उद्योजक आणि आमचे कारागिर यांच्या हितांसाठी आम्ही कार्य केले पाहिजे. त्यांना वाऱ्यावर सोडून आम्ही कोणताही व्यवहार करु शकत नाही. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक व्यापार करारासंदर्भात चर्चा केली जात आहे. हा करार समतोल, न्यायोचित आणि उभयपक्षी हिताचा असावा, अशी भारताची इच्छा आहे. भारताचे प्रयत्नही तसेच आहेत. चर्चा वेगाने आणि मनमोकळ्या वातावरणात होत आहे. दोन्ही देश एकमेकांना समजून घेत आहेत, असा अर्थाचे प्रतिपादन गोयल यांनी केले आहे.
केव्हीन हॅसेट यांचे विधान
व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार केव्हिन हॅसेट यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासंदर्भात नुकतेच एक विधान एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. दोन्ही देशांमध्ये वेगाने चर्चा होत असून दोन्ही देश आता ‘फिनिश लाईन’च्या अगदी नजीक पोहचले आहेत. चर्चातील मुद्दे जटील असले, तरी ती यशस्वी होईल आणि दोन्ही देशांमध्ये करार लवकरच होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पियुष गोयल यांनी त्यांच्या भाषणात प्रतिक्रिया व्यक्त करताना या करारासंबंधी चर्चेची माहिती दिली.
दोन्ही देश चांगले मित्र
भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते सर्व अडचणींवर लवकरच मात करतील आणि करारासंबंधी सकारात्मक वृत्त लवकरच मिळेल. भारताचे रशियाशी संबंध आणि इतर काही वादाच्या मुद्द्यांमुळे ही चर्चा बरीच जटील बनली आहे. तरीही दोन्ही देश एकमेकांच्या जवळ येत असून अडचणींवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण आहे, असे केव्हिन हॅसेट यांनी त्यांच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा स्पष्ट केले होते.
प्रथम टप्पा जवळपास पार
याच व्यापार चर्चेच्या संदर्भात भारताच्या प्रशासनातील एका महत्वाच्या अधिकाऱ्यानेही माहिती दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार कराराच्या प्रथम टप्प्यासंबंधी चर्चा आता पूर्ण होत आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर जे प्रचंड व्यापार शुल्क लागू केले आहे, ते कमी करण्याच्या दृष्टीने प्रथम प्रयत्न केले जात आहेत. त्यासंबंधी लवकरच एक सकारात्मक पाऊल उचलले जाण्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केल्याने आशेला एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
एका जटील मुद्द्यावर तोडगा….
या चर्चेतील सर्वात जटील मुद्दा भारत रशियाकडून करत असलेल्या इंधन तेलाच्या खरेदीचा होता. तथापि, आता भारताने ही तेलखरेदी बरीच कमी केली आहे. भारताच्या सरकारी आणि खासगी तेल कंपन्यांनी रशियाला नव्या ऑर्डरी देणे थांबविले आहे. तसेच, भारताने नुकताच अमेरिकेशी इंधन वायू खरेदी करण्याचा करार केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात थायलंड येथे एका संरक्षण विषयक कराराची रुपरेषाही ठरविण्याचा करार झाला आहे.
Comments are closed.