वसईत भरदिवसा सशस्त्र दरोडा, मुलाला बांधले; आईला भोसकले

निवासी संकुलात भरदुपारी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना वसईत घडली आहे. तीन दरोडेखोरांनी घरात घुसत मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले तर घरातील महिलेला भोसकले. त्यानंतर या दरोडेखोरांनी 10 लाखांचा ऐवज लुटून धूम ठोकली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वसई पूर्वेच्या वालीव सातिवली परिसरात रिलायबल ग्लोरी नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील 301 क्रमांकाच्या घरात राऊत कुटुंबीय राहतात.
सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी इमारतीत शिरकाव केला. तिसऱ्या मजल्यावरील राऊत यांच्या दारावरील बेल त्यांनी वाजवली. त्यानंतर राऊत यांच्या 15 वर्षांच्या मुलाने दार उघडले. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या तिघांनी मुलाला जोरदार धक्का दिला आणि घरात जाऊन मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. मुलाची आई संगीता राऊत या स्वंयपाकघरात होत्या. दरोडेखोरांनी तिथे घुसून तिच्यावरही चाकूने हल्ला करून त्यांना बांधून ठेवले.
दरोडेखोर काही क्षणातच फरार
बांधून ठेवलेल्या संगीता राऊत यांच्याकडून दरोडेखोरांनी कपाटातील चावी घेतली. त्यानंतर कपाटात असलेले तब्बल 10 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर काही क्षणातच फरार झाले. या घटनेत संगीता राऊत या जखमी झाल्या आहेत.
पकडण्यासाठी चार पथके
भरदिवसा पडलेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी चार पथके तयार केली असून गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करत असल्याची माहिती परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली.

Comments are closed.