ठाण्यात 100 कोटींचा गुंतवणूक घोटाळा, नौपाडा पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा

ठाण्यात 100 कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. कमी कालावधीत जादा परताव्याचे आमिष दाखवून एका टोळीने तब्बल 200 गुंतवणूकदारांना 100 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घोटाळ्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला असून हे प्रकरण आता अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

तक्रारदार हे मुंबईचे रहिवासी असून त्यांची ओळख एका गुंतवणूकदार दलालाशी होती. या दलालाने व त्याच्या टोळीतील अन्य जणांनी अनेक गुंतवणूकदारांना हेरून तुमचे पैसे उद्योग-धंद्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा देऊ, अशी बतावणी केली.

इतेकच नाही तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ठाणे ते नौपाडा परिसरात कंपनीचे कार्यालयदेखील थाटले होते. दरम्यान सन 2016 मध्ये आरोपी हसमुख शहा व अशोक पासड यांच्या बतावणीनंतर फिर्यादीने मे. एकदंत हाऊसिंग या संस्थेमध्ये धनादेशाद्वारे 8 लाखांची गुंतवणूक केली. सन 2018 पर्यंत आरोपींनी दीड टक्क्याप्रमाणे तक्रारदाराला नियमित व्याज दिले, पण त्यानंतर व्याज देणे बंद केले. त्याबाबत फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता आर्थिक परिस्थिती खराब असल्याने ते पैसे देऊ शकत नाहीत, असे सांगण्यात आले.

गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली
हक्काचे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने याची अधिक चौकशी तक्रारदाराने केली असता हसमुख शहा व अशोक पासड यांनी त्याच्याकडील एकदंत हाऊसिंग या संस्थेमध्ये जवळपास 200 गुंतवणूकदारांची 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून कसून चौकशी करण्यात येणार आहे. धर्मेश ठक्कर (3 लाख), भक्ती ठक्कर (3 लाख), नेहा इंटरप्राईजेस (6 लाख), हरी ओम स्टेशनरी (5 लाख), हिरेल गाला (25 लाख), किनारी गाला (5 लाख) अशी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची नावे आहेत.

Comments are closed.