आत्महत्येच्या प्रयत्नातील अत्यवस्थ रुग्णाला पालिका रुग्णालयात बेड नाकारला, शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासन ताळ्यावर

आत्महत्येच्या प्रयत्नातील अत्यवस्थ रुग्णाला वाशी येथील पालिका रुग्णालयाने बेड नाकारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसैनिकांनी रुग्णालय प्रशासनाला दणका दिला आणि तत्काळ रुग्णावर उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे ताळ्यावर आलेल्या डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार केले असून त्याचे प्राण वाचले आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसरातील एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबाबत माहिती मिळताच या व्यक्तीचे परिचित असलेले आकाश शिंगटे यांना तत्काळ वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपस्थित डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेताच बेड नसल्याचे कारण देत उपचार नाकारले. याची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख महेश कोटीवाले, उपशहरप्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी पालिका रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना फैलावर धरले.
रुग्णांच्या जिवाशी खेळ; कारवाईची मागणी
शहरप्रमुख महेश कोटीवाले व उपशहरप्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी डॉक्टर राजेश म्हात्रे यांच्याशी फोनवर संपर्क साधल्यानंतर या रुग्णाला बेड उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. दरम्यान रुग्णाच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली जाणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला.

Comments are closed.