उल्हासनगरात वालधुनी नदीवर दुसरा पादचारी पूल; विद्यार्थी, महिला, नागरिकांची होणार सोय

वालधुनी नदीवर दुसरा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलामुळे विद्यार्थी, महिला तसेच विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आदेश उल्हासनगर महापालिकेच्या मनीषा आव्हाळे यांनी दिले आहे. या नव्या पुलामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकासमोर वालधुनी नदीवर 45 वर्षांपूर्वी चांदीबाई महाविद्यालयाकडे जाणारा पूल उभारला होता. या पुलाची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. तसेच दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराचे पाणीदेखील पुलावरून गेल्याने पाइप व फरशा वाहून गेल्या होत्या. जुना पूल कमकुवत झाला आहे, त्याचे खांबही गंजले आहेत. दिवसेंदिवस पुलावरील वाहतूक वाढत गेल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.

सर्व अडथळे दूर करणार
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवा पादचारी पूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची पाहणी नुकतीच अधिकाऱ्यांनी केली. पुलाच्या कामामध्ये मंदिर तसेच जुना जकात नाका बाधित होत असून त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल अशी माहिती उपअभियंता संदीप जाधव यांनी दिली. सर्व अडथळे दूर करून पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे.

Comments are closed.