शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला

मिंध्यांच्या मंत्र्यांनी मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यावरून सध्या मिंधे व भाजप मध्ये सुरू असलेले वाद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टोला मिंधे गटाला लगावला आहे.

”भाजप व मिंधे दोघेही एक सारखे आहेत. भाजपने मिंधेंची अनेक लोकं पळवली तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. पण ज्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या त्यामुळे या विषयावर एवढा गोंधळ झाला. शिंदेचे मंत्री आता शिंदेचंही ऐकत नाही. त्यांचे बॉस आता फडणवीस झाले आहेत. बऱ्याच जणांनी स्वत:च्या चुली केल्या आहेत”, असे अंबादास दानवे म्हणाले.

भाजपमध्ये गेल्यावर देशद्रोह्याचा देशप्रेमी होतो

सरकारच्या कृपेवर नवाब मलिक बाहेर आहेत. हेच भाजप, फडणवीस आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे म्हणत होते. आता हेच देशद्रोही देशप्रेमी झाले आहेत. अजित दादांसोबत बसतात म्हणजे भाजपसोबत बसतात. स्वत:कडे आल्यावर देशद्रोह्याचा देशप्रेमी होतो. गुन्हेगाराचा संत होतो”, असे अंबादास दानवे म्हणाले.

आता फक्त पक्ष, राष्ट्राचं काहीही होऊ दे असं भाजपचं वर्तन

”पालघरमध्ये याच भाजपने साधू संतांवर हल्ला झाला म्हणून महाराष्ट्रात आंगडोंब उसळवला होता, त्याच प्रकरणातील मुख्य आरोपीला यांनी पक्ष प्रवेश दिला हे कोणतं हिंदुत्व आहे? आता तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात याच भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. ही कोणती संस्कृती आहे. कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व नंतर व्यक्ती. आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काहीही होऊ दे असं भाजपचं वर्तन झालेलं आहे”, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Comments are closed.