या 3 कारणांमुळे टीम इंडिया WTC फायनलपासून दूर राहणार? गंभीर यांनी आखलेली योजना उलटी ठरणार
कोलकाता कसोटीमध्ये झालेल्या पराभवाने टीम इंडियाची चिंता दुपटीने वाढवली आहे. घरच्या मैदानावर आणखी एक मालिका गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलपर्यंत पोहोचणंही आता अधिक कठीण होत चाललं आहे. अलीकडच्या काळात टीम इंडियाने ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळलं आहे, त्यावरून हे स्पष्ट होतं की संघात अनेक कमकुवत जागा आहेत आणि त्यावर मॅनेजमेंटला तातडीने काम करावं लागणार आहे. सध्या अशी तीन मोठी कारणं दिसत आहेत, ज्यामुळे भारतासाठी WTC फायनल गाठणं अवघड होत आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी स्पष्ट केलं आहे की, ते स्पिन ट्रॅकवरच खेळण्याचा आग्रह धरणार आहेत. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना स्पिन खेळण्याची कला आत्मसात करावी लागेल. पण सध्या टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज स्पिन गोलंदाजीला तोंड देण्यात अपयशी ठरत आहेत, आणि खेळायचंही स्पिन पिचवरच आहे. त्यामुळे काही मालिकांमध्ये जिंकणं अवघड बनलं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळायचं आहे. तिथेही क्लीन स्वीप करणे अत्यंत कठीण आहे. घरच्या मैदानावरील जिंकण्याचं प्रमाण वाढलं नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
भारतालाही न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, जिथे टीम इंडियाचा भूतकाळातील रेकॉर्ड अत्यंत निराशाजनक आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला तर फायनलची वाट आणखी लांबेल. त्याचप्रमाणे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांची मालिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. स्पिन चांगला न खेळण्याची भारताची कमतरता इथेही मोठा अडथळा ठरू शकते, कारण श्रीलंकेची टीम देखील स्पिन ट्रॅकवर खेळण्यात पारंगत आहे.
गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून भारताची कसोटी क्रिकेटमधील वाट अधिक कठीण होत चालली आहे. घरच्या मैदानावरही पराभवाचा सामना करावा लागला आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे संघात सतत होत असलेले बदल.
मॅनेजमेंटला अजूनही स्थिर नंबर 3 चा फलंदाज सापडलेला नाही. नंबर 6 च्या स्थानावरही नियमित असा फलंदाज निश्चित होऊ शकलेला नाही. याशिवाय, खूप जास्त अष्टपैलू खेळाडूवर अवलंबून राहण्याच्या धोरणामुळेही टीम इंडियासाठी अडचणी वाढल्या आहेत.
Comments are closed.