सात नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : दोन दिवसांत 13 नक्षली ठार, 28 जणांना अटक,40 लाख रुपये बक्षीस असलेला मेतुरू जोगाही ठार,चकमकीत 8 शस्त्रे जप्त, दोन एके-47चा समावेश

वृत्तसंस्था/रायपूर

छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश मिळाले आहे. मरेदुमिल्ली पोलीस स्थानक परिसरातील गंवलसा येथील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे अर्धा तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी सात कट्टर नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलासाठी ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 एके-47 सह एकूण 8 शस्त्रs जप्त केली. इतर नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता दूर करण्यासाठी सुरक्षा पथके सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात शोध घेत होते.

चालू आठवड्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी दोन दिवसांत एकूण 13 कट्टर नक्षलवाद्यांना ठार केले आहे. शिवाय, आंध्रप्रदेश पोलिसांनी विजयवाडासह अनेक जिह्यांमधून 28 हून अधिक माओवाद्यांना अटक केली आहे. बुधवारी ठार झालेल्या नक्षलींमध्ये लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्यांचा समावेश आहे. त्यात सर्वात प्रमुख म्हणजे मेतुरू जोगा राव उर्फ टेक शंकर याचेही नाव आहे. तो नक्षलवादी संघटनेच्या विशेष क्षेत्रीय समितीचा सदस्य असून त्याच्यावर 40 लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांनी या चकमकीत सितो उर्फ ज्योतीलाही ठार मारले. ती डीव्हीसीएम सदस्य होती आणि तिच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. मोठे बक्षीस असलेल्या इतर अनेक नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला.

सततच्या शोधमोहिमेमुळे यश

गेल्या दोन दिवसांत या भागात नक्षलवाद्यांच्या लक्षणीय हालचाली दिसून आल्या. मंगळवारी, नक्षलवादी कमांडर माडवी हिडमाच्या पथकाशीही चकमक झाली. परिणामी, सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केल्यामुळे बुधवारी सकाळी 6:30 ते 7:00 वाजेच्या दरम्यान पुन्हा चकमक झाली. सुरक्षा दलाने ही चकमक व्यापक रणनीती आखत यशस्वी करून दाखविली आहे.

कारवाई सुरूच ठेवणार

छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचा कणा कमकुवत होत आहे. परिणामी, अनेक नक्षलवादी आता राज्य सीमा ओलांडून आंध्रप्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांनीही त्यांच्या नक्षलविरोधी कारवाया तीव्र केल्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमेवर वारंवार चकमकी होत असल्याचे बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या या मोठ्या कारवाईत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही कारवाई सुरूच राहील आणि परिसरातील उर्वरित नक्षलवादी शक्ती पूर्णपणे नष्ट केली जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

ठार झालेले नक्षलवादी

  • मेटुरू जोगा राव उर्फ टेक शंकर, विशेष झोनल कमिटी सदस्य, 40 लाख बक्षीस
  • सुरेश उर्फ रमेश, विशेष झोनल कमिटी सदस्य, 40 लाख बक्षीस
  • ज्योती उर्फ सितो, डीव्हीसीएम सदस्य, 8 लाख बक्षीस
  • लोकेश उर्फ गणेश, डीव्हीसीएम सदस्य, 8 लाख बक्षीस
  • सैनू उर्फ वासू, डीव्हीसीएम सदस्य, 8 लाख बक्षीस
  • अनिता, डीव्हीसीएम सदस्य, 8 लाख बक्षीस
  • शम्मी, डीव्हीसीएम सदस्य, 8 लाख बक्षीस

Comments are closed.