आत्मघाती बॉम्बस्फोट इस्लाममध्ये 'हराम' आहे
दहशतवादी उमरच्या व्हिडिओवर ओवैसी यांचे प्रत्युत्तर
सर्कल/हैदराबाद
दिल्ली स्फोटाचा आरोपी उमर नबीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. यात उमर हा सुसाइड बॉम्बिंगवरून खोटे दावे करताना दिसून येतो. हा व्हिडिओ जुना असून तो आता जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी एयाएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उमर नबीकडून आत्मघाती हल्ल्याला ‘शहादत’ ठरविण्याच्या प्रयत्नांना चुकीचे ठरविले आहे. इस्लाममध्ये आत्महत्या हराम (निषिद्ध) असून निर्दोष लोकांची हत्या एक मोठे पाप आहे. असे कृत्य धर्माच्या विरोधात असण्यासह देशाच्या कायद्याचेही उल्लंघन करणारे आहे. हा प्रकार केवळ दहशतवाद आहे. अशाप्रकारची मानसिकता देश आणि समाज दोघांसाठीही धोकादायक असल्याचे ओवैसी यांनी म्हटले.
दहशतवादी उमर केवळ दिशाभूल करू पाहत असल्याचा दावाही ओवैसी यांनी केला आहे. ओवैसी यांनी दिल्ली स्फोटावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लक्ष्य केले. अलिकडेच ऑपरेशन सिंदूर आणि ‘महादेव’दरम्यान शाह यांनी संसदेत बोलताना मागील 6 महिन्यांमध्ये कुठलाच स्थानिक काश्मिरी युवक दहशतवादी संघटनेत सामील झाला नसल्याचा दावा केला होता. मग हा समूह कुठून आला. या समुहाचा थांगपत्ता लावण्यास आलेल्या अपयशासाठी कोण जबाबदार, असे प्रश्नार्थक विधान ओवैसी यांनी केले आहे. दिल्ली स्फोटाचा आरोपी उमर नबीचा हा व्हिडिओ त्याच्या भावाच्या फोनमध्ये मिळाला आहे. हल्ल्यापूर्वी हा व्हिडिओ रिकॉर्ड करण्यात आला होता असा संशय तपास यंत्रणांना आहे. या व्हिडिओत उमर हा इंग्रजीत बोलत असल्याचे दिसून येते.
Comments are closed.