ATM मधून फाटलेली नोट आल्यास काय कराल? जाणून घ्या पद्धत
पैसे काढण्यासाठी दर वेळी आपण बँकेत जाऊ शकत नाही. अशा वेळी एटीएममधून पैसे काढणे सोयीस्कर पडते. एटीएममधून पैसा काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर होतो. मात्र बऱ्याचदा त्यातून काढलेल्या नोटा या फाटलेल्या असतात. अशा वेळी त्या नोटांचं काय करावं? हा प्रश्न पडतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही घाबरून जाऊ नका. याबाबत आरबीआयने काही नियम आखून दिलेले आहेत. त्यामुळे या फाटलेल्या नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता. ( How to exchange torn note recieved from atm? )
जर एटीएममधून काढलेली नोट जास्त फाटलेली असेल किंवा त्यावरील नंबर स्पष्ट नसेल तर बहुतेकदा ती बाजारात स्वीकारली जात नाही. अशावेळी ती नोट बदलून देण्याची जबाबदारी ही बँकेची असते. मात्र त्यासाठी एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आरबीआयच्या नियमांनुसार एटीएममधून आलेल्या फाटलेल्या किंवा खराब नोटेच्या बदल्यात ग्राहकांना पूर्ण रक्कम परत दिली जाते.
बँकेतील प्रक्रिया:
जर बँकेतून फाटलेली नोट आली तर एटीएममधून रिसिप्ट घ्यायला विसरू नका. नंतर ज्या बँकेतून नोट काढली होती त्या बँकेच्या शाखेत जा. बँकेला नोट एटीएममधून आल्याचं सांगा. तुमच्याकडे असलेली एटीएमची रिसिप्ट बँक कर्मचाऱ्यांना दाखवा. रिसिप्ट नसेल तरी हरकत नाही तुमच्या व्यवहारांचा रेकॉर्ड बँकेकडे असतो. बँक कर्मचारी नोटेची स्थिती तपासतात. नोट खरी असली की ताबडतोब फाटलेली नोट बदलून नवीन नोट दिली जाते किंवा तुम्हाला पावती देऊन ती एक- दोन दिवसांत उपलब्ध केली जाते.
या गोष्टी महत्त्वाच्या:
नोट बनावट नसावी.नोटेवरचा नंबर दिसला पाहिजे. नोटेचे दोन तुकडे झालेले असतील तर तर अनेकांना ती चिटकवण्याची सवय असते. अशी नोट बँकेकडून स्वीकारली जात नाही. त्यामुळे नोट चिटकवू नका. तर ती तशीच बँकेत जमा करा.
फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा बदलणे ही पूर्णपणे मोफत सेवा आहे. बँकेकडून यासाठी शुल्क आकारले जात नाही. जर तुम्हाला एटीएममधून कधीही फाटलेली किंवा खराब झालेली नोट मिळाली तर बँकेकडून तुम्हाला नक्कीच ती नोट बदलून नवीन नोट दिली जाते, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही.
Comments are closed.