स्वच्छता विभागात सावळागोंधळ; मग घरफाळा कसा मागता? नागरिकांचा कोल्हापूर महापालिकेला सवाल

महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वाहनांचा तुटवडा पाहाता गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक व त्यांची उपसमिती त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरली आहे. या विभागात सावळा गोंधळ सुरू आहे, त्यामुळे घरफाळा कसा काय मागता, असा सवाल करत, या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन आणि कोल्हापूर शहर तीन आसनी प्रवासी रिक्षा संघटनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व सर्व घटकांना एकत्रित करून महापालिकेने यावरची आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा ‘असहकार आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर शहराच्या 81 वॉर्डांत सुमारे 1 लाख 70 हजार मिळकती, 6.5 कि.मी.चे रस्ते आणि सुमारे 9 ते 10 लाख लोकसंख्या आहे. रस्ते, गटारी, फुटपाथ यांची दैनंदिन साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेचा स्वतंत्र सॅनिटरी विभाग आहे.
कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा विभाग दरवर्षी करदात्यांकडून जनरल टॅक्स, सफाईकर यांसारख्या करांच्या नावावर घरफाळा गोळा करते. महापालिका करदात्यांकडून घरफाळा वसूल करत असेल, तर सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन हा विभाग मनुष्यबळ व यंत्रणा यांनी परिपूर्ण असला पाहिजे. मात्र, या विभागात सावळा गोंधळ सुरू असून, स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments are closed.