क्रीडा विश्वातून – पंड्या, बुमराला विश्रांती?

आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानला दुहेरी फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे दोघेही एकदिवसीय मालिकेतून दूर राहू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने या दोघांनाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता बीसीसीआयच्या सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

हार्दिक अजूनही मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार त्याला थेट 50 षटकांच्या सामन्यात उतरवणे धोकादायक ठरेल. त्यामुळे त्याचा भर फक्त टी-20 क्रिकेटवर असणार आहे. सध्या पंड्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ‘रिटर्न टू प्ले’ ट्रेनिंग घेत असून टी-20 विश्वचषकातील त्याच्या फिटनेसला प्राधान्य दिले जात आहे.

सेन, प्रणॉय दुसऱ्या फेरीत

लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय या स्टार खेळाडूंसह पाच हिंदुस्थानी खेळाडूंनी दमदार सुरुवात करत बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान निश्चित केले. 2021च्या वर्ल्ड कपमधील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने चायनीज तैपेईच्या सु ली-यांगवर 21-17, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात केली. याबरोबरच एच. एस. प्रणॉयने खराब सुरुवातीनंतर जबरदस्त पुनरागमन करीत योहानेस साउत मार्सेलिनोला 57 मिनिटांत 6-21, 21-12, 21-17 असे हरवले.

हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात

हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगैसीचा विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवास टायब्रेकमधील पराभवाने संपला. चीनच्या जीएम वेई यीने उपांत्यपूर्व लढतीत अर्जुनला टायब्रेकमध्ये हरविले, अन्  हिंदुस्थानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत अर्जुन एरिगैसीच्या रूपाने हिंदुस्थानचा एकमेव शिलेदार उरला होता.

Comments are closed.