मुश्फिकुर रहीमचा 100व्या कसोटीत ऐतिहासिक पराक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला केवळ 11वा खेळाडू

बांगलादेश संघ आयर्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, ज्यातील दुसरा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेश क्रिकेटचा सर्वात अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मुशफिकुर रहीमसाठी ही कसोटी खास आहे, कारण तो त्याचा 100वा कसोटी सामना खेळणार आहे. दुसऱ्या दिवशी खेळताना मुशफिकुरने त्याचे 13वे कसोटी शतक पूर्ण करून त्याची 100 वी कसोटी आणखी खास बनवली. यासह, मुशफिकुर रहीम जागतिक क्रिकेटमध्ये पूर्वी फक्त 10 खेळाडूंचा समावेश असलेल्या एलिट यादीत सामील झाला.

कोणत्याही खेळाडूसाठी 100 कसोटी सामने खेळण्याचा प्रवास सोपा नाही आणि म्हणूनच, फार कमी खेळाडूंना हा टप्पा गाठण्यात यश आले आहे. मुशफिकुर रहीम हा 100 कसोटी सामने पूर्ण करणारा पहिला बांगलादेशी खेळाडू आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, रहीम 99 धावांवर नाबाद होता. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा, मुशफिकुर रहीमने शतक पूर्ण केले आणि तो 100व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम करणारा जागतिक क्रिकेटमधील फक्त 11वा खेळाडू ठरला. मुशफिकुर रहीमच्या आधी, कॉलिन काउड्रे, जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, अॅलेक स्टीवर्ट, इंझमाम-उल-हक, रिकी पॉन्टिंग, ग्रॅमी स्मिथ, हाशिम अमला, जो रूट आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली होती.

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला शतकाने खास बनवणारा मुशफिकुर रहीम 106 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रहीमला आयर्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू हम्फ्रीजने बाद केले. बांगलादेशने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंडचा डाव आणि 47 धावांनी पराभव केला.

Comments are closed.