रवींद्र जडेजाला काढून चेन्नईत घेतलेल्या संजू सॅमसनला कोणत्या क्रमांकाची जर्सी?

आयपीएल 2026 हंगामाआधीच चेन्नई सुपर किंग्सने मोठी चाल खेळत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि भारताचा स्टार विकेटकीपर संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत दाखल झाला आहे. सीएसकेने रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा सॅम करनला राजस्थानकडे पाठवत हा महत्त्वाचा ट्रेड पूर्ण केला. या बदलानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून सीएसकेकडून आलेल्या नवीन व्हिडीओत संजूचा चेन्नई जर्सीतील पहिला लूक पाहायला मिळाला.

सीएसकेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संजू सॅमसन 11 क्रमांकाची पिवळी जर्सी परिधान करताना दिसला. यावरून हे स्पष्ट झाले की आयपीएल 2026 मध्ये तो 11 नंबरच्या जर्सीसह सीएसकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्ससाठीही सॅमसनने याच क्रमांकाची जर्सी घातली होती. तर भारतीय संघासाठी खेळताना तो 9 नंबरचा जर्सी नंबर वापरतो. सध्या मोहम्मद शमी भारतीय संघात 11 नंबरची जर्सी घालतो, त्यामुळे तो नंबर सॅमसनसाठी उपलब्ध नसतो.

दरम्यान, संजू सॅमसनच्या आगमनानंतरही चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावर कोणताही बदल होणार नाही, असे सीएसके व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने तात्पुरते नेतृत्व स्वीकारले होते. मात्र, यंदाच्या हंगामात संजू सॅमसन आणि धोनी दोघेही संघात असतानाही ऋतुराज गायकवाडच सीएसकेचा अधिकृत कर्णधार असणार आहे.

आयपीएलमधील संजू सॅमसनची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली आहे. 31 वर्षीय या बॅटरने आजवर आयपीएलमध्ये 177 सामने खेळत 4704 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 139.1 इतका दमदार असून त्याने तीन शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत. मधल्या फळीतील त्याची निडर फलंदाजी आणि मोठे शॉट मारण्याची क्षमता यामुळे तो आयपीएलचा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून ओळखला जातो.

Comments are closed.