उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ: उदयनराजे भोसले
सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी एकत्र येऊन नगराध्यक्ष पदासाठी भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या अमोल मोहिते यांना शुभेच्छा आहेत. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेत भाजप नगराध्यक्ष पदासह सर्व जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यात फक्त आश्वासन मिळाली मात्र याची वचनपूर्ती भाजपने केली, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
भाजप साताऱ्यात सर्व जागा जिंकेल : शिवेंद्रराजे भोसले
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे प्रथमच मनोमिलनातून भाजप पक्षाच्या चिन्हावर एकत्र येऊन निवडणूक लढवीत आहेत. साताऱ्यामध्ये आज दोघांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष उमेदवारीसाठी निश्चित झालेले अमोल मोहिते यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपने सातारा नगरपालिकेमध्ये सर्व जागांवर आपले उमेदवार दिले असल्याचे स्पष्ट करत मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना देखील सातारा नगरपालिकेमध्ये एक जागा दिली असल्याचं यावेळी सांगितलं.
शिवेंद्रराजे भोसलेंनी भाजपच्या विचाराचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष सातारा नगरपालिकेत निवडून येतील, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आणि भाजप पक्षातील ताकतीवर ही निवडणूक आम्ही नक्कीच जिंकू असं देखील ते म्हणाले. माघार घेण्याचा उद्या दिवस असला तरी शंभर टक्के उद्या चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे
उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये : खासदार उदयनराजे भोसले
खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मनोमिलनामुळे दोन्ही राजेंच्या गटातील बंडखोरी केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारीबाबत आवाहन केलं आहे. सातारा नगरपालिकेमध्ये उमेदवारी द्यायची कुणाला याबाबत आम्हा दोघांच्या मनात मोठा प्रश्न होता, मात्र जे लोक लोकांसाठी झटले. अनेक प्रश्न मार्गी लावले हा निकष आम्ही सर्वांसमोर लावून हे उमेदवार निवडले आहेत, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
सातारा नगरपालिकेमध्ये 50 जागा आहेत यामध्ये कोणताही दुजाभाव झालेला नाही. एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र आता बदल का झाला तर त्या काळात फक्त आश्वासन दिली गेली. त्याच आश्वासनांची वचनपूर्ती ही भाजप काळात झाली. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी कोणीही नाराज होऊ नये त्यांना भविष्यात चांगली संधी दिली जाईल, असा विश्वास यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.