गुवाहाटीतही गिलशिवया, पंताकडे नेतृत्व

मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यात अपयश आल्याने हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहाटी येथे शनिवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे उपकर्णधार ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

कोलकाता कसोटीत पहिल्या डावातच गिलला मानेच्या दुखण्याने सतावले होते. त्यामुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले. त्यामुळे तो पुन्हा मैदानात दिसलाच नव्हता. त्याच्या मानेचे दुखणे आता कमी झाल्यामुळे तो गुवाहाटीत संघाबरोबरच दाखल झाला. त्याच्या खेळण्याबाबत साशंकता कायम होती, मात्र त्याला अधिक विश्रांतीची गरज असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले आहे. पुन्हा त्याच्या मानेला दुखापत होण्याचा धोका लक्षात घेऊन त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो कसोटीच नव्हे तर 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया एकदिवसीय मालिकेतील मैदानाबाहेर बसण्याची शक्यता आहे. त्या मालिकेसाठी 23 नोव्हेंबरला संघ जाहीर केला जाणार आहे.

गिलच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानला साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल किंवा नितीश कुमार रेड्डी या तिघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. संघातील डावखुऱया फलंदाजांची संख्या अधिक झाल्याने त्यांना कसे खेळवायचे याचे गणित व्यवस्थापनाला नीट मांडावे लागणार आहे. कोलकात्यातील पहिल्या कसोटीत डावखुऱया फलंदाजांविरुद्ध फिरकीवीर सायमन हार्मरने केलले धमाके अजूनही डोळय़ासमोर आहेत. त्याच्याविरुद्ध हिंदुस्थानी फलंदाजांना कोलकात्यात केलेली चूक टाळावी लागणार आहे. पहिल्या कसोटीत मानेच्या दुखापतीमुळे गिल फक्त तीन चेंडू खेळून निवृत्त झाला होता आणि नंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्याच्या गैरहजेरीत हिंदुस्थान 124 धावांचा पाठलाग करतानाही 93 धावांत गारद झाला.

गुवाहाटीच्या सराव सत्रात यशस्वी जैसवाल, के.एल. राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल हे प्रथम फलंदाजीला उतरले. त्यानंतर साई सुदर्शनला सराव देण्यात आला. पडिक्कलला मात्र सुरुवातीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तो नेटमध्ये ऑफस्पिन टाकताना दिसला. नितीश रेड्डीही पुन्हा संघात सामील झाला असून सरावात त्याने गोलंदाजी केली. गुवाहाटीची खेळपट्टी कोलकात्यापेक्षा फलंदाजांना साथ देणारी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अतिरिक्त फिरकीऐवजी संतुलित संघरचना मांडण्यासाठी रेड्डीची निवड केली जाणार असल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.